
पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांमधील प्रवेश अर्जांमधून जातीचा रकाना काढून टाकण्याचे आदेश हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी दिले. शिमला येथे आयोजित हिमाचल प्रदेश अनुसूचित जाती कल्याण मंडळाच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
समाजात जातीवर आधारित भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि बंधुभाव व समानता यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जात दर्शवणारा रकाना काढून टाकणे हे या दिशेने टाकलेले एक पाऊल असेल, असे सुक्खू म्हणाले.
एका निवेदनानुसार, सरकारी योजनांचा लाभ घेताना अनुसूचित जाती समुदायातील विद्यार्थ्यांनी आपली जात नमूद करणे आवश्यक आहे, यावरही सुक्खू यांनी जोर दिला. सरकारने या समुदायाच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत आणि त्यांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवला जाईल, असे सुक्खू यांनी पुढे नमूद केले.

























































