
जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील सुंब येथील दुर्गम वनक्षेत्रात परदेशी सॅटेलाइटचा सिग्नल मिळाल्याने खळबळ उडाली. सुरक्षा दलाकडून संबंधित परिसरात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी संबंधित परिसरात घेराबंदी करून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा यंत्रणांना सांबा क्षेत्रातील सुंब भागात सकाळी 11.15 च्या सुमारास इरिडियम सॅटेलाइट कम्युनिकेशन उपकरणाचा सिग्नल प्राप्त झाला. हा सिग्नल मिळताच लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी दाट जंगलाने वेढलेल्या या डोंगराळ भागाची नाकेबंदी केली, असे सूत्रांनी सांगितले.
सध्या संबंधित उपकरणाचा सिग्नल बंद झाला असून, त्यानंतर कोणताही नवीन सिग्नल आढळलेला नाही. जंगल आणि परिसरातील टेकड्यांवर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. तसेच, सुंबकडे जाणाऱ्या मार्गांवरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

























































