
दोघे आकंठ प्रेमात होते… त्यांनी भविष्याची स्वप्नेही रंगवली होती… त्यातच प्रेयसी राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. भावी बायको अधिकारी होणार म्हणून प्रियकाराला आकाश ठेंगणे झाले, पण अचानक मुलीच्या वडिलांनी दोघांच्या नात्याला नकार दिला आणि सर्वच फिस्कटले. राग अनावर झालेल्या तरुणाने प्रेयसीने चोरटय़ा मार्गाने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याचे बिंग फोडले. याप्रकरणी एमपीएससीचे अपर सचिव अभिजित लेंडवे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
नंदुरबारची ऋतुजा पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मार्च 2026 मध्ये घेतलेल्या औषध निरीक्षक या गट ‘ब’ परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. राज्यात ती सातव्या क्रमांकावर आली. इथपर्यंत सर्वकाही सुरळीत होते. पण मुलीचे वडील अमृत पाटील यांना आपल्या गुणी मुलीचे गौरव ऊर्फ लोकेश पाटील (24) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समजले. अधिकारी झालेल्या मुलीच्या प्रेमसंबंधाला वडिलांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे ऋतुजा हिने गौरवला आता आपले नाते संपले, असे ठणकावून सांगितले. जिच्यावर जिवापाड प्रेम केले, प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, तिनेच असा दगा द्यावा हे गौरवला सहन झाले नाही. त्याने एका मित्राच्या मदतीने थेट एमपीएससीकडे तक्रार केली आणि एमपीएससीचा पेपर फोडून ऋतुजा उत्तीर्ण झाल्याचे सांगितले.
पोलीस तपासात भांडापह्ड, सहा जण लटकले
एमपीएससीकडे पेपर फुटल्याची तक्रार आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने तपास सुरू केला. त्यात एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांचा एक संच बनवून तो ऋतुजाला देण्यात आल्याचे समोर आले. मग पेपरफुटीची लिंक उघड झाली. अमृत यांना प्रवीण यांनी प्रश्न संच आणून दिला. प्रवीण यांना एमपीएससीचे सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांनी तो संच उपलब्ध करून दिला. जवळपास 295 प्रश्नांचा संच एमपीएससीचे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते (35) आणि अवर सचिव अभिजित लेंडवे (38) यांनी दिल्याचे समोर येताच गौरवसह या पाच जणांना अटक करण्यात आली. मयुरचा शोध सुरू आहे.
अख्खा प्रश्न संच मिळवला!
नंदुरबार येथील एका शाळेत अमृत पाटील (55) हे मुख्याध्यापक आहेत. त्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक हा पुरस्कारदेखील मिळाला आहे. कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी एमपीएससी परीक्षेच्या पेपरमधील प्रश्नांचा संच आणून दिला होता. त्या प्रश्नांचा अभ्यास करून ऋतुजा उत्तीर्ण झाली. मयुर ठाकरे नामक व्यक्तीच्या मध्यस्थीने अमृत व प्रवीण यांची ओळख झाली होती.
भरती प्रक्रिया रद्द, फेरपरीक्षा होणार
एमपीएससीने ही भरती प्रक्रियाच रद्द करून औषध निरीक्षक, गट ब पदासाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना फेरपरीक्षेसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून कोणतेही शुल्कही आकारले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
एमपीएससीचे अध्यक्ष हे फार मोठय़ा नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, अन्यथा 1 सप्टेंबरपासून आंदोलन
एमपीएससीचे अध्यक्ष फार मोठय़ा नेत्याचे मित्र आहेत. आरटीओचे कमिशनर असताना त्यांनी काय काय गोंधळ घातला याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रभरात आहे, एमपीएससीच्या अध्यक्षांनी आणि सचिवांनी राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवा. राजीनामा नाही दिला तर 1 सप्टेंबरला आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
12 लाखांचा सौदा
नकाते, मराठे व लेंडवे यांनी पदाचा गैरवापर करत परीक्षेसाठी बनवलेल्या प्रश्न संचातील 295 प्रश्नांचा संच मिळवून तो ऋतुजा हिला दिला होता. हा सगळा व्यवहार 12 लाखांमध्ये ठरला होता. त्यापैकी पाच लाख दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मालमत्ता कक्षाचे प्रभारी निरीक्षक मंगेश देसाई अधिक तपास करीत असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. फुटलेल्या प्रश्नांचा संच आणखी कोणाला मिळाला याचाही तपास सुरू आहे. ऋतुजा गैरमार्गाने उत्तीर्ण झाल्याचे ठाऊक असतानाही गौरवने ते लपवल्याने त्याच्यावरदेखील अटकेची कारवाई करण्यात आली.




























































