
‘‘रोजगार देण्याच्या नावाखाली पर्यावरणाची ‘राख’ करणारे उद्योग कोकणावर लादले जात आहेत, तर गुजरातमध्ये चांगल्या प्रकल्पांची रांगोळी काढली जात आहे. हे चालणार नसून असले उद्योग कुठेतरी थांबले पाहिजेत,’’ अशा शब्दांत शिवसेना नेता, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सरकारवर हल्ला चढवला. ‘‘रोजगार द्यायचाच असेल तर पर्यावरणपूरक किंवा पर्यटनाशी संबंधित उद्योग आणा. एमआयडीसी कशी जपता येईल हे बघा,’’ असेही त्यांनी सुनावले.
रत्नागिरी जिह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सोयीसुविधांची आदित्य ठाकरे यांनी आज पाहणी केली. त्यानंतर उद्योग भवन येथे उद्योजकांसोबत चर्चा केली. उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील उद्योगांच्या स्थितीवर परखड भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्र्यांच्या व राज्य सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला. ‘‘राज्यातील अनेक औद्योगिक वसाहतींची स्थिती या एमआयडीसीसारखी आहे. अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा नाहीत. सरकार लक्षच देत नसल्यामुळे चाकण, हिंजवडीतील उद्योग राज्याबाहेर चालले आहेत. लोटेतील उद्योगांची तीच स्थिती आहे. उद्योग बंद होत असल्याने रोजगार हिरावला जात आहे,’’ अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. या वेळी शिवसेना नेते विनायक राऊत, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख अंकुश काते आणि जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे उपस्थित होते.
प्रदूषणकारी प्रकल्प उद्योग मंत्र्यांना माहीत नाहीत का?
लक्ष्मी ऑर्गेनिक पंपनी लोटे येथे पीफाससारखे घातक रसायनाचे उत्पादन करत असल्याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘प्रदूषणकारी प्रकल्प हे उद्योग मंत्र्यांना माहीत नाहीत का? उरणमध्ये तर श्वास घेऊ शकत नाही अशी अवस्था आहे. कोकणात येणारे प्रदूषणकारी प्रकल्प आणि मायनिंगबाबत आमची पूर्वीचीच भूमिका कायम आहे. कोकणात बेकायदेशीर मायनिंग होता कामा नये,’’ असे त्यांनी ठणकावून सांगितले.
भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करायला सरकार घाबरतेय!
आदित्य ठाकरे यांनी या वेळी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांचे कौतुक केले. ‘‘भास्कर जाधव हे चांगले काम करतात. आम्ही दोघेही अधिवेशनात सातत्याने आवाज उठवत असतो. आमचे सर्व आमदार आम्हाला साथ देतात. त्यांच्या कामामुळेच भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करायला सरकार घाबरत आहे,’’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत एमआयडीसीत चालून दाखवावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत चाकणच्या किंवा लोटेच्या एमआयडीसीत चालून पाहावे. ते येणार असतील तर मी उद्या पुन्हा इथे यायला तयार आहे. त्यांनी माझ्यासोबत चालून उद्योजकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. आज इथे वीज नाही, पाणी नाही आणि रस्तेही नाहीत. मग उद्योग कसे उभे राहणार,’’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
उद्योजकांवर दबाव
‘‘लोटे औद्योगिक वसाहतीतही उद्योजक अडचणीत असल्याची माहिती मिळाल्यामुळे मी आज येथे आलो. बंद दाराआड उद्योजकांशी चर्चा केली, कारण त्यांच्यावरही दबाव आहे. त्यांना काही ना काही करून अडचणीत आणले जाऊ शकते,’’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘‘आमचे सरकार असताना सुभाष देसाई उद्योग मंत्री होते आणि मी पर्यावरण मंत्री होतो. त्या वेळी उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही समिती स्थापन केली होती. आमच्यानंतर आलेल्या सरकारने त्यावर अपेक्षित काम केले नाही आणि उद्योजकांना वाऱयावर सोडले. मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री महाराष्ट्रात उद्योग आणल्याच्या, गुंतवणूक आणण्याच्या घोषणा करतात, पण हे सर्व हवेत असते,’’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
ही एमआयडीसी की कन्स्ट्रक्शन साईट?
लोटे औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांबाबत आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. लोटय़ात पोहोचल्यानंतर गाडीतून उतरलो तेव्हा एका भल्यामोठय़ा खड्ड्याने माझे स्वागत केले. औद्योगिक वसाहतीत आलोय की कन्स्ट्रक्शन साईटवर आलोय, असा प्रश्न पडल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘‘एमआयडीसीतले रस्ते पाहिले. त्या रस्त्यांवर डांबर दिसले नाही. मी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांना विचारले की, हा रस्ता कुणाचा? इथले पालकमंत्री कोण? उद्योग मंत्री कोण? तेव्हा मला कळले की, रस्त्यातील डांबर कुठे गेलं?’’ असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे नाव न घेता हाणला.































































