
“मी… अमुक अमुक… गंगाजलाला साक्षी मानून शपथ घेतो की, नगरपालिकेतील भ्रष्टाचारातून जो काही पैसा मिळेल तो माझ्या गटातील सर्वांशी इमानदारीने वाटून घेईन…”
चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहानपूरच्या ६० नगरसेवकांनी अशी शपथ घेतल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून उसकी दखल घेत पालिका प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक नगरसेवक सर्वांना गंगाजल वाटताना दिसतो. ते वाटून झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांना शपथ देतो आणि इतर सगळे त्याचे अनुकरण करतात. पालिकेतून मिळणारा पैसा समसमान वाटण्याची शपथ ते घेतात. त्याचबरोबर, आपल्या गटातील कोणीही अडचणीत आल्यास प्रत्येक जण त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहील, असा निर्धार व्यक्त करतात. ही शपथ मोडणारा गद्दार असेल, असेही ठणकावताना दिसतात. सोशल मीडियावर या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.


























































