
गणेशोत्सव मंडळांसमोर आता बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न निर्माण झाले आहे. ऑगस्टमध्ये पालिकेकडे मुंबईभरातून तब्बल 3 हजार 704 तक्रारी दाखल झाल्या आहेत. पालिकेने खड्ड्यांच्या तक्रारीसाठी सुरू केलेल्या ‘पॉटहोल क्विकफिक्स’ अॅप, ‘माय बीएमसी’, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मार्ग हेल्पलाइन आणि 1916 हेल्पलाइनवर या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. खड्ड्यांसह लोंबकळणाऱया केबल, बेकायदा पार्ंकग, अनावश्यक स्पीडब्रेकर, बुजवलेल्या खड्ड्यांच्या उंचवटय़ांमुळेही आगमनात अडचणी येत आहेत.
मुंबईसाठी चार वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांत मुंबईत सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याची घोषणा केली. मात्र अजूनही शेकडो किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण झालेले नाही. अंतर्गत रस्त्यांची तर अक्षरशः चाळणच झाली आहे. पालिकेकडून मात्र सिमेंट काँक्रीटीकरण सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात अर्धवट राहिलेली कामे, बुजवलेल्या खड्ड्यांचे उंचवटे यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना बाप्पा मंडपात कसे न्यायचे, असा प्रश्न पडला आहे.
विसर्जन मार्गांचीही अवस्था बिकट
गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर आल्यामुळे शनिवार-रविवारसह दररोज मोठय़ा प्रमाणात गणेशमूर्ती लालबाग-परळसह पूर्व-पश्चिम उपनगरातून शेकडो मूर्ती मंडपाकडे रवाना होत आहेत. यामध्ये विशेषतः उपनगरातील आगमन मार्गांवर अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शिवाय विसर्जन मार्गावरचे रस्तेदेखील खड्डेमय आहेत.
दोन दिवसांत खड्डे बुजवून स्पीडब्रेकर काढा, शिवसेनेची मागणी
गणेशोत्सव अवघ्या 15 दिवसांवर आला आहे. विकेंडला मोठय़ा गणेशमूर्ती कार्यशाळेतून वाजतगाजत मंडपाच्या दिशेने निघताना दिसत आहेत. 29 आणि 30 ऑगस्ट रोजी अनेक मंडळे बाप्पाच्या आगमनाचा मुहूर्त साधणार आहेत. त्यापूर्वीच या मार्गांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवक किरण तावडे यांनी स्थापत्य समितीच्या बैठकीत केली. उपाध्यक्ष अजय पाटील यांनीही शुक्रवारपर्यंत खड्डे, पॅचेच भरून स्पीडब्रेकर काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावर प्रशासनाने सकारात्मक उत्तर दिले.
गणपतीच्या आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. याबाबत समन्वय समितीकडे दररोज तक्रारी येत आहे. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. – नरेश दहिबावकर, अध्यक्ष, समन्वय समिती































































