
अक्कलकोट तालुक्यातील हंजगी-अक्कलकोटदरम्यान सुरत-चेन्नई महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी हंजगी येथील पाझर तलावातून मोठय़ा प्रमाणात मुरुमाचा उपसा केला जात आहे. मात्र, मुरूम वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे हंजगी-बागेहळ्ळी-अक्कलकोट रस्त्याची पुरती वाट लागली आहे.
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नांतून हंजगी-बागेहळ्ळी-अक्कलकोट रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, सुरत-चेन्नई महामार्गासाठी मुरुम वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे अवघ्या एका महिन्यातच हा रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, संपूर्ण रस्ता उखडल्याने वाहनधारकांसह पायी जाणारे शेतकरी, महिला, शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे हंजगी-बागेहळ्ळी ग्रामस्थांनी मुरूम वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखून संताप व्यक्त केला.
जोपर्यंत हंजगी-बागेहळ्ळी-अक्कलकोट रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण केले जात नाही, तोपर्यंत मुरुमाच्या गाड्या बंद करण्यात याव्यात, अशी मागणी करत बागेहळ्ळी येथे ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यापूर्वीही हंजगी-बागेहळ्ळी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेत ठराव घेऊन संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार, तसेच संबंधित दक्षिण पोलीस ठाण्याला निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही मुरुमाची वाहतूक सुरूच राहिल्याने आज ग्रामस्थांनी अवजड गाड्या रोखून तीक्र संताप व्यक्त केला.
ग्रामीण भागातील रस्ते हे मर्यादित निधीतून तयार केले जात असल्याने त्यांची क्षमता मर्यादित असते. अशा रस्त्यांवरून अवजड गाडय़ांची सतत वाहतूक झाल्यास रस्ता लवकर खराब होतो. हंजगी-बागेहळ्ळी रस्त्यासाठी यापूर्वी ग्रामस्थांनी तीक्र आंदोलन करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही घेतला होता.
दिवस-रात्र एक करून रस्त्यासाठी पाठपुरावा केला
दिवस-रात्र एक करून हंजगी-बागेहळ्ळी रस्त्याला निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा करून रस्ता डांबरीकरण करून घेतला आहे. मात्र, केवळ एका महिन्यातच हा रस्ता खराब झाला आहे. अवजड गाडय़ांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. प्रथम हंजगी-बागेहळ्ळी रस्त्याचे डांबरीकरण करा आणि त्यानंतरच मुरुमाची वाहतूक सुरू करा, अशी मागणी शेतकरी अप्पाराव ठाणेदार यांनी केली आहे.




























































