
महाबळेश्वर शहरासह तालुक्यात आगामी सार्वजनिक गणेशोत्सव डॉल्बीमुक्त, शांततेत, उत्साहात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता साजरा करा, असे आवाहन पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी केले.
पोलीस विभागाच्या वतीने शहर व तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या आढावा बैठकीत पोलीस निरीक्षक गालिंदे बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व मुख्याधिकारी योगेश पाटील उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी गणेशोत्सव मंडळांना शासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले. यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे ‘डॉल्बीमुक्त’ वातावरणात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. तसेच ‘आदर्श गणेशोत्सव मंडळ’ कसे असावे, ध्वनिप्रदूषणाचे नियम, मिरवणुकीचे मार्ग, सुरक्षेचे उपाय आणि वर्गणीसंदर्भातील नियमावलीबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
उत्सव काळात नागरिकांना आणि मंडळांना कोणत्याही नागरी समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासकीय समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. या बैठकीला महाबळेश्वर शहर व परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, विविध गावचे पोलीस पाटील आणि स्थानिक प्रतिष्ठत नागरिक असे सुमारे 100 ते 125 नागरिक उपस्थित होते. पोलीस प्रशासन व इतर नागरी विभागांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जाईल, असा विश्वास गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केला.
नगरसेवक राहुल पिसाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख महेश गुजर, संदीप मोरे, शंकर ढेबे, अशोक शिंदे, राजेंद्र पवार, ओंकार पवार, राजेंद्र साळवी, संतोष चिकणे, आकाश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या कार्यकर्ते व मंडळ यांच्याविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी बैठकीत दिला.



























































