
न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमास न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘दुजाभाव करणाऱ्या, संकुचित विचारांच्या प्रत्येक संघटनेला माझा नेहमीच ठाम विरोध राहिला आहे,’ असे परखड मत ममदानी यांनी मांडले.
आरएसएसच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी मोहन भागवत हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. ‘युनिव्हर्सल वननेस’ या कार्यक्रमात ते सहभागी होणार असून शनिवारी मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये अनिवासी हिंदुस्थानींशी संवाद साधणार आहेत. भागवत यांच्या या कार्यक्रमाच्या विरोधात न्यूयॉर्कमध्ये निदर्शने होत आहेत. हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी होत आहे. एका पत्रकार परिषदेत ममदानी यांना याबाबत विचारले असता त्यांनी, माझा या कार्यक्रमाशी संबंध नाही. मी अशा कार्यक्रमांना अजिबात पाठिंबा देत नाही. उलट माझा या कार्यक्रमास तीव्र विरोध आहे, असे ते म्हणाले.
अशा संघटनेचा उदय चिंताजनक
‘न्यूयॉर्कच्या इतिहासातील मी पहिला हिंदुस्थानी-अमेरिकन महापौर आहे. माझ्या आईचे संपूर्ण कुटुंब अजूनही हिंदुस्थानात आहे. मला माहीत असलेला हिंदुस्थान हा एक बहुसांस्कृतिक आणि प्रत्येक व्यक्तीला सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष समाज आहे. त्यामुळे कोणत्याही देशात संकुचित विचारसरणीवर आधारित चळवळीचा उदय होणे हे माझ्यासाठी त्रासदायक आहे. केवळ एक हिंदुस्थानी-अमेरिकन म्हणून नव्हे, तर रंग, विचारसरणी, धर्म, श्रद्धा किंवा वंशाचा विचार न करता तिच्यावर विश्वास दाखवणाऱ्या न्यूयॉर्कचा महापौर म्हणूनही माझा अशा संघटनेला विरोध आहे,’ असे ते म्हणाले.
कार्यक्रम रोखणार का?
महापौर पदाचा अधिकार वापरून मोहन भागवत यांचा कार्यक्रम रद्द करणार का, असे विचारले असता ममदानी यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘एखादा खासगी कार्यक्रम रद्द करणे माझ्या अधिकार क्षेत्रात येते का याबाबत मला नीट माहिती नाही,’ असे ममदानी यांनी सांगितले.




























































