
तिबेटमधील भूकंपामुळे हिमस्खलन होऊन आलेल्या महाभयंकर पुरामुळे नेपाळमध्ये बुधवारी जलप्रलय आला. तिबेटच्या पर्वतरागांमधून वाहणाऱ्या भोटे कोशी नदीच्या पुराचे पाणी राक्षसी वेगाने नेपाळमध्ये घुसले आणि अक्षरशः हाहाकार माजला. या पुराच्या पाण्याने नेपाळमधील चार जिह्यांना वेढा घातला. शेकडो गावे पाण्यात बुडाली. इमारती भुईसपाट झाल्या. गाडय़ा, रस्ते, पुलांसह नेपाळमधील अनेक जलविद्युत प्रकल्प वाहून गेले. यात 157 लोकांचा मृत्यू झाला असून 500 पर्यटक बेपत्ता झाले आहेत. त्यात 133 हिंदुस्थानी आणि 52 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्या हिंदुस्थानी नागरिकांमध्ये कैलास मानसरोवरला गेलेल्या यात्रेकरूंची संख्या सर्वाधिक असल्याचे समजते. महाराष्ट्रातील चार यात्रेकरूही तिबेटमध्ये अडकले आहेत. दरम्यान, नेपाळ सीमेलगत असलेल्या बिहारच्या आठ जिह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीमा भागातील नद्यांच्या पाणी पातळीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
तिबेटमध्ये नेपाळ सीमेलगत भूकंपाचा धक्का बसल्याने ल्हेंडे नदीत हिमस्खलन झाले. बर्फाचे डोंगर कोसळल्याने नदीत पाणी वाढले. चीनने या नदीवर मोठे बांध बांधले आहेत. पाण्याचा जोर एवढा वाढला की हे बांध फुटले आणि हे पाणी भोटे कोशी नदीला जाऊन मिळाले. त्यामुळे रसुवा येथील भोटे कोशी नदीला अचानक महापूर आला. तब्बल 30 फुटांपर्यंत उंच लाटा उसळल्या आणि हाहाकार उडाला.
पुरामुळे केवळ जीवितहानीच झाली नसून नेपाळला जबर आर्थिक तडाखा बसला आहे. देशातील सहा मोठय़ा हायड्रोपावर प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. अनेक रस्ते, पूल वाहून गेल्यामुळे पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. वीज पुरवठा यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे.
हिंदुस्थान मदत पाठवणार, हेल्पलाईन सुरू
पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांच्याशी चर्चा केली. संकटकाळात हिंदुस्थान नेपाळच्या सोबत आहे, असे आश्वासन मोदींनी दिले. तसेच हिंदुस्थानकडून नेपाळला मदत पाठवण्याची तयारी केली जात आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी 977 985 131 6807 आणि 977 970 910 7500 या क्रमांकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
बचावकार्यात लष्कर आणि हेलिकॉप्टर्स
पुरानंतर नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांनी आपत्कालीन बैठक घेतली. त्यात मदत व बचावकार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच बचावकार्याला वेग देण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले. पूरग्रस्त भागांत मदतीसाठी लष्कराच्या जवानांसह 15 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत 65 नागरिकांची पुरातून सुटका करण्यात आली आहे.
तामीळनाडूतील 56 जण बेपत्ता
133 बेपत्ता हिंदुस्थानींमध्ये 56 जण तामीळनाडूतील पर्यटक आहेत. या पर्यटकांचा शोध घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री के. जोसेफ विजय यांनी नेपाळ सरकार आणि केंद्र सरकारला केली आहे.महापुरामुळे नेपाळचे 80 सुरक्षा कर्मचारी बेपत्ता असून त्यात 44 जवानांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशीर रवनाल यांनी दिली.
दोन महिलांची प्रकृती बिघडली
कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील स्मिता पवार, योगिनी पाटील, दिनेश भोसले, पूजा भोसले तिबेटमधील जिलोंग (केरुंग) शहरात अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील स्मिता पवार आणि योगिनी पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मानसरोवर परिसरातून तातडीने खाली आणले आहे. त्यांना काठमांडूत हलवण्याची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.




























































