
देशातले रस्ते हे स्पेस टेक्नॉलॉजीने बनवल्याचा दावा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री करतात. आमच्या देशात असे रस्ते बनवा असे निमंत्रण दुबईच्या राजाने दिल्याचेही सांगतात, पण हीच का तुमची रस्ता बनवण्याची स्पेस टेक्नॉलॉजी? दुबईच्या राजाने हा खड्डय़ात गेलेला मुंबई-गोवा महामार्ग पाहिला तर काय होईल, असा टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला. रायगडातील रस्त्यांपेक्षा पालकमंत्र्यांचे महामार्गावर लागलेले बॅनर मात्र ए-वन क्वॉलिटीचे आहेत, असे त्यांनी सुनावले.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करण्याचे आश्वासन दरवर्षी महायुतीचे सरकार देत आहे. मात्र गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही पेणच्या डोलवीपासून ते थेट राजापूरपर्यंत या महामार्गाचे काम जागोजागी लटकून पडले आहे. रस्त्यावर असंख्य जीवघेणे खड्डे पडले आहेत. सर्व्हिस रोडची ठिकठिकाणी अक्षरशः चाळण झाली असून चिखलाचा राडारोडा पसरला आहे. कोकणवासीयांची जीवनवाहिनी असलेल्या या महामार्गाच्या दुर्दशेची युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मॅरेथॉन पाहणी केली.
सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरे पेण येथील डोलवी गावाजवळ पोहोचले. डोलवीसह नागोठणे येथील रस्ता तसेच माणगाव बायपास कामाची त्यांनी पाहणी केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा दर्जा, नियोजनातील त्रुटी, धोकादायक पूल, अपुरे क्रॉसिंग, बायपास व सर्व्हिस रोडची झालेली भयानक दुरवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकडे सरकार आणि प्रशासनाने केलेले सपशेल दुर्लक्ष पाहून आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
पालकमंत्र्यांच्या बॅनरची क्वॉलिटी ए-वन आहे, पण मुंबई-गोवा महामार्गावर कोकणवासीयांना दणके खात खड्डय़ांतून प्रवास करावा लागत आहे. पालकमंत्र्यांच्या बॅनरच्या ए-वन क्वॉलिटीसारखे गुळगुळीत रस्ते कधी होणार?
डोलवीच्या अंडरपासमध्ये मासे
डोलवी येथील रस्त्याच्या अंडरपासची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली. या अंडरपासच्या खाली पाण्याचा मोठा डोह निर्माण झाल्याची परिस्थिती होती आणि या पाण्यात मासेही पोहत होते. या तुंबलेल्या पाण्यातूनच स्थानिक नागरिकांना रोज जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यंदाही गणेशभक्त तासन्तास वाहतूककोंडीत अडकणार
माणगाव बायपासची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे आश्वासन सरकारने दिली आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. कोकण रेल्वेची परवानगी, मेगाब्लॉक आणि गर्डर उभारण्याचे काम अपूर्ण असून 16 पैकी अवघे चार गर्डरच तयार आहेत. त्यामुळे माणगाव बायपासचे काम सुरू होण्यासाठी आणखी किमान सहा महिने लागतील, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातही भाविकांना तासन्तास वाहतूककाsंडीत अडकून पडावे लागणार असून सरकारने या काळात जादा ट्रफिक पोलीस तैनात करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
नागोठण्याचा उड्डाणपूल आठ दिवसांत बंद
नागोठण्याच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्यानंतर त्याला अवघ्या आठ दिवसांत भलीमोठी भेग पडली. अवघ्या आठ दिवसांत पुलाच्या भिंती फुगल्या, भेगा पडल्या. तो पूल बंद करावा लागला ही सरकारची मोठी नामुष्की आहे. या पुलाच्या कामाचा दर्जा काय असेल ते पाहा असे ते म्हणाले.
जे कंत्राटदार मंत्र्यांचे खिसे भरतात त्यांची बिले निघतात
सरकारने ठेकेदारांची कोटय़वधींची बिले थकवली आहेत. त्यामुळे काही शासकीय कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या. यावर ते म्हणाले, जे कंत्राटदार प्रामाणिकपणे काम करतात त्यांची बिले थकीत असतात. पण जे कंत्राटदार मंत्र्यांच्या खिशांचे खड्डे भरतात त्यांची बिले मात्र वेळेवर काढली जातात.
शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख नंदू शिर्पे, नरेश गावंड, दीपश्री पोटफोडे, डॉ. स्विटी गिरासे, नरेश अहिरे, सतीश पाटील, दर्शना जवके, महानंदा तांडेल, अविनाश म्हात्रे, समीर म्हात्रे, प्रभाकर ढेपे, शंकर गुरव, भाई तडवे, संतोष ठाकूर, बी. एच. पाटील, नंदू सुतार, जगदीश ठाकूर, गणपत म्हात्रे, प्रकाश मेस्त्राr, मधुकर नाडकर, नगरसेवक संदीप पालकर, सुहास पाटील, विद्देश आचार्य, भगवान पाटील, राजू पाटील, वसंत म्हात्रे, चेतन मोकल, संतोष पाटील, नीलेश म्हात्रे, योगेश पाटील, असदअली अखवारे आदी उपस्थित होते.
जनतेकडून टोलचे हजारो कोटी रुपये ओरबाडायचे, जाहिरातींवर खोक्यांनी उधळपट्टी करायची, पण कोकणवासीयांना मात्र खड्डय़ातूनच प्रवास करायला लोटायचे हे या सरकारचे पाप आहे.































































