
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत अभियांत्रिकीमध्ये ‘ऑनर्स विथ रिसर्च’ पदवी अभ्यासक्रमाला मंजुरी दिली आहे. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणार आहे. या उपक्रमामुळे बी.ई. च्या पदवीसोबतच विद्यार्थ्यांना स्वतंत्र संशोधन प्रकल्पावर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे.
अभ्यासक्रमासाठी अर्हता
-
नियमित प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या ते पाचव्या सत्रापर्यंत कोणताही अनुशेष (बॅकलॉग) नसणे आणि पाचव्या सत्रात किमान ७.५ CGPI असणे आवश्यक आहे. थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसरे ते पाचवे सत्र अनुशेषमुक्त असणे आणि पाचव्या सत्रात ७.५ CGPI आवश्यक असेल.
-
सहाव्या सत्रात विद्यार्थ्यांना संशोधन प्रस्तावाची रूपरेषा सादर करावी लागेल. संबंधित अभ्यास मंडळाकडून तिचे मूल्यांकन करण्यात येईल.
-
विद्यार्थ्यांना दोन कॉन्फरन्स शोधनिबंध किंवा ‘स्कोपस-इंडेक्स्ड’ / ‘वेब ऑफ सायन्स’ नियतकालिकामध्ये एक शोधनिबंध सादर करावा लागेल.
-
या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना बी.ई. च्या नियमित क्रेडिट्सव्यतिरिक्त १८ अतिरिक्त क्रेडिट्स पूर्ण करावे लागतील. यामध्ये ‘रिसर्च मेथडॉलॉजी’चे ४, ‘रिसर्च पब्लिकेशन’चे १० आणि अंतिम मूल्यांकनाचे ४ क्रेडिट्स असतील.





























































