
अंधेरी पूनम नगर येथील धोकादायक पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येणार आहे. या रहिवाशांना आता दरमहा 20 हजारांऐवजी 25 हजार रुपये भाडे मिळणार आहे. भाडेवाढ करण्याबाबतचा प्रस्ताव म्हाडा मंजुरीसाठी लवकरच राज्य शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अंधेरी पूनम नगर येथील पीएमजीपी वसाहतीत चार मजली 17 इमारती असून त्यात 942 निवासी तर 42 अनिवासी गाळे आहेत. 30 वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती धोकादायक अवस्थेत असून वारंवार येथे स्लॅब कोसळून रहिवाशी जखमी होण्याच्या घटना घडतात. म्हाडा बी.जी. शिर्पे कंत्राटदाराच्या माध्यमातून या वसाहतीचा पुनर्विकास करणार आहे. या ठिकाणी 17 मजली 10 विंग बांधण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. पीएमजीपी कॉलनीतील रहिवाशांना 33 महिन्यांचे एकत्रित भाडे देऊन या वसाहती पुनर्विकासासाठी रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
दरमहा 20 हजार रुपयांऐवजी 25 हजार रुपये भाडे मिळावे, अशी मागणी रहिवाशांकडून वारंवार केली जात होती. यासंदर्भात शिवसेनेचे स्थानिक आमदार अनंत (बाळा) नर यांनीदेखील म्हाडाकडे पाठपुरावा केला होता. अखेर भाडेवाढीच्या प्रस्तावाला म्हाडा उपाध्यक्षांनी ग्रीन सिग्नल दिला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. भाडेवाढीमुळे पीएमजीपी वसाहत लवकर रिक्त होण्यास आणि पुनर्विकासाच्या प्रक्रियेला वेग येण्यास मदत होणार आहे.


























































