
मेट्रो ३ अर्थात मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. आरे ते कफ परेड मार्गावर सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होऊनही नियमित प्रवासी संख्या जेमतेम २ लाखांच्या आसपास आहे. अपेक्षित उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के प्रवासी भुयारी मेट्रोने प्रवास करत आहेत. न परवडणारे तिकीट दर आणि स्थानकांचे नियोजन चुकल्यामुळे प्रवाशांनी मेट्रोकडे पाठ फिरवल्याचे मत वाहतूक तज्ज्ञ व्यक्त करतात.
मुंबईकरांचा प्रवास सुसाट करण्यासाठी तब्बल २३ हजार कोटींहून अधिक रक्कम खर्चून भुयारी मेट्रोचे बांधकाम करण्यात आले. ३३.५ किमीच्या आरे ते कफ परेड मार्गावर ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्ण क्षमतेने मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. पूर्ण सेवा सुरू झाल्यानंतर नियमित प्रवासी संख्या १४ ते १६ लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज होता. मात्र पूर्ण मार्गावरील सेवेला दहा महिने उलटत असतानाही प्रवासी संख्येतील वाढ संथगतीने सुरू आहे. सद्यस्थितीत या मार्गिकेवर सरासरी १.५ लाख ते २ लाख इतकेच प्रवासी रोज प्रवास करत आहेत. मेट्रो स्थानकातून उतरल्यानंतर कार्यालयात वा घरी जाण्यासाठी रिक्षा, टॅक्सी किंवा बससेवांचे योग्य जाळे पूर्णपणे तयार झालेले नाही. तसेच तिकिटांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ होत नसल्याचे वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे.
लोकल ट्रेनची गर्दी, वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ भुयारी मेट्रोमुळे लोकल ट्रेनवरील गर्दीचा ताण कमी होईल, तसेच रस्त्यावरील वाहनांचे प्रमाण कमी होऊन कोंडीचा प्रश्न सुटेल, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र भुयारी मेट्रोची महागडी सेवा तसेच मेट्रो स्थानके आवश्यक ठिकाणी नसल्यामुळे लोकल ट्रेनची गर्दी आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला आहे.
“लोकल ट्रेनच्या मासिक पासच्या तुलनेत मेट्रोचे रोजचे भाडे प्रवाशांच्या खिशाला परवडणारे नाही. मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा कार्यालय वा घर गाठण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. त्यात १५० रुपये खर्च होत असतील, तर सामान्य प्रवासी भुयारी मेट्रोकडे कसे वळतील?” – विवेक पै, वाहतूक तज्ज्ञ

























































