ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची मालकी पालिकेकडेच राहायला हवी, ‘एमसीए’च्या हक्क मागणीला शिवसेनेचा ठाम विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्कची मालकी मुंबई महानगरपालिकेकडेच रहायला हवी, अशी मागणी शिवसेनेने पालिकेकडे केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या मैदानाचे हक्क आपल्याला मिळावेत यासाठी पालिकेकडे केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविका श्रवरी परब यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे ही मागणी केली आहे.

शिवाजी पार्क पालिकेचे आणि मुंबईचे वैभव आहे. या मैदानाचा विकास, संवर्धन आणि योग्य देखभाल करण्यासाठी पालिका पूर्णपणे सक्षम आणि कटिबद्ध असताना ‘एमसीए’ने पालिकेकडे या मैदानाच्या हक्कांची मागणी केली आहे. ‘एमसीए’ची ही मागणी संशयास्पद असून त्यांच्या हेतूबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. एकीकडे मुंबई शहर आणि उपनगरातील खेळाच्या मैदानांचे मूळ आरक्षण बदलून ती इतर खासगी विकासक आणि विशिष्ट संस्थांच्या घशात घातली जात असल्यामुळे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनहितासाठी ‘मैदाने बचाव’ चळवळ सुरू केली आहे. नेमक्या याच काळात ‘एमसीए’ने शिवाजी पार्कच्या हक्कांची मागणी केल्याने यामागे राजकीय कुटील डाव असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दररोज शेकडो होतकरू क्रिकेटपटू सराव करतात. भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे क्रिकेटपटू या मैदानात घडले आहेत. त्यामुळे या मैदानाचा मूळ उद्देश आणि सार्वजनिक स्वरूप अबाधित राहणे गरजेचे आहे. याच मैदानावर प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनी संचलन होते. राजकीय पक्षांच्या सभा होतात. याच मैदानावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ आहे. त्यामुळे शिवाजी पार्कचे हक्क पालिकेकडेचे राहावेत, अशी सर्वसामान्य मुंबईकर, मराठी माणसाची इच्छा आहे. त्यामुळे आयुक्तांनी या विषयात तातडीने लक्ष घालून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी श्रवरी सदानंद परब यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.