
बाजारपेठेत खोट्या नोटा चालवून व्यापाऱ्यांना गंडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. प्रवीण पाटील असे त्याचे नाव असून त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ४१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामागे बनावट नोटा विकणाऱ्यांचे मोठे रॅकेट असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रविवारी रात्री पाली बाजारपेठेतील हटाळेश्वर नाका ते भोईआळी नाका यादरम्यानच्या मार्गावर प्रवीण पाटील भामटा बनावट नोटांचा वापर करत असल्याचे समजले होते. या खोट्या नोटा हुबेहूब खऱ्या चलनी नोटांसारख्या भासवून त्याने बाजारपेठेतील विविध दुकानदारांकडून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. मात्र पोलिसांनी फिल्डिंग लावून पाटील याला रंगेहाथ पकडले. प्रवीण पाटील हा पेण येथील गोळीबार मैदान, फणस डोंगरी परिसरात राहतो, तसेच तो मूळचा पेण दादर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याची कसून झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी या सर्व नोटा हस्तगत केल्या आहेत. त्याला अटक करण्यात आली असून पाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



























































