भाजप परिवहन दालनाची सभापतींच्या उद्घाटन पत्रिका हिंदीत, भाईंदर पालिकेत मराठीचा घोर अवमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांच्या स्वागताची मराठीऐवजी गुजरातीतून उद्घोषणा करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपचा मोगलाई उद्धारक कारभार सुरू झाला आहे. भाजपचे परिवहन सभापती राजकुमार मिश्रा यांच्या पालिकेतील कार्यालयाच्या उद्घाटन पत्रिकेवरून मराठी भाषाच गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही पत्रिका संपूर्णपणे हिंदीमध्ये छापण्यात आली असून भाजपच्या या मराठीद्वेष्ट्या कारभाराचा जाब विरोधकांनी विचारला आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सभापतीपदी भाजपचे राजकुमार मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना महापालिकेतील एक दालन देण्यात आले आहे. या दालनाचे सुशोभीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन उद्या गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. निमंत्रण पत्रिका मराठीतून छापणे बंधनकारक असतानाही ती हिंदीतून छापण्यात आली आहे. भाजपच्या या मनमानी कारभाराविरोधात महापालिकेतील विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. परिवहन सभापतींना मराठीचा विसर पडला आहे काय? की ते जाणूनबुजून मराठीचा अवमान करत आहेत, असा सवाल विचारला जात आहे.

भाजपचे मराठीप्रेम बेगडीच
एकीकडे उत्तर भारतीय लोक महाराष्ट्राची अस्मिता असलेली मराठी भाषा शिकण्यास तयार झाले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारीच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका हिंदीत छापून मराठीचा घोर अवमान करत आहेत. अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजपचे मराठी भाषेविषयीचे प्रेम हे बेगडी आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.