
नेपाळ-तिबेट सीमावर्ती भागात बुधवारी सकाळी अचानक आलेल्या पुरामुळे 170 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांमध्ये 300 हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश आहे. यात कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या भाविकांसह हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन जोडप्याचाही समावेश आहे. दीपक आहुजा (60) आणि मधू आहुजा (57) अशी बेपत्ता जोडप्याची नावे आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दीपक आहुजा आणि मधू आहुजा हे ‘ट्रेकर्स सोसायटी’ या टूर ऑपरेटरमार्फत प्रवास करत होते. हे जोडपे ईशा सेक्रेट वॉक्ससोबत तीर्थयात्रेसाठी अमेरिकेतून आले होते, असे आहुजा यांचे जावई आकाश महतानी यांनी सांगितले. पूर आला तेव्हा ते तिबेटमधील ग्यिरोंग इमिग्रेशन केंद्रावर होते, अशी पुष्टी संस्थेने केली आहे. हे जोडपे ग्रुप एस3 सोबत कैलास मानसरोवर यात्रेवरून परतत असतानाच ही भीषण स्थिती निर्माण झाली. हे जोडपे बेपत्ता असल्याने त्यांचे कुटुंबीय मदतीसाठी आवाहन करत आहेत. कुटुंबीय आणि टूर ऑपरेटर्सनी हे जोडपे बेपत्ता होण्यापूर्वीच्या त्यांच्या हालचालींबाबतची माहिती गोळा केली आहे.
दीपक आणि मधू आहुजा यांना शेवटचे तिबेटमधील सागा येथे पाहिले गेले होते. तिथे नेपाळच्या सीमेकडे दक्षिणेकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी आपल्या यात्रा गटासह सद्गुरूंची भेट घेतली होती. या जोडप्याच्या फोनचे शेवटचे लोकेशन 26 ऑगस्ट रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.00 च्या सुमारास तिबेटमधील ग्यिरोंग इमिग्रेशन केंद्रावर सापडले होते. त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार, या जोडप्याला ग्यिरोंग बंदरावर इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून, तिमुरे मध्ये प्रवेश करायचा होता आणि रसुवा जिल्ह्यातून रस्त्याने काठमांडूला जायचे होते, जिथून ते विमानाने दिल्ली आणि अमेरिकेला परत जाणार होते.
मुसळधार पावसामुळे अचानक पूर आणि भूस्खलन झाले. सीमावर्ती भागाशी संपर्क तुटला आहे. यात सर्व वाहून गेले. दूरसंचार सेवा, वीजपुरवठा आणि स्थानिक रस्ते नेटवर्कमध्ये मोठा व्यत्यय आल्यामुळे सीमेच्या दोन्ही बाजूंना बचाव कार्यात अडचणी येत आहेत. ग्यिरोंग, तिमुरे, स्याब्रुबेसी, रसुवा किंवा नुवाकोट येथे कार्यरत असलेल्या बचाव पथकांना, क्षेत्रीय रुग्णालयांना, हेलिकॉप्टरद्वारे लोकांना बाहेर काढणाऱ्या ऑपरेटर्सना आणि स्थानिक स्वयंसेवकांना दीपक आणि मधू आहुजा यांच्या शोधासाठी आपत्कालीन नोंदवही, निवारा केंद्रांची यादी आणि प्रवेश नोंदी तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


























































