
लग्नात मित्र मंडळीकडून मिळणाऱ्या भेटवस्तूचे व्हिडीओ सोशल मीडिय़ावर व्हायरल होत असतात. नवदाम्पत्याला त्यांच्या वैवाहिक आयुष्य सुरू करण्यासाठी लागणाऱ्या अनेक लहान गोष्टी मित्रमंडळींनी गिफ्ट म्हणून त्यांना दिलेलं आपण पाहिलं असेल. मात्र, एका व्यक्तीने आपल्या नवविवाहित मित्राला आणि त्याच्या पत्नीला दिलेली अनोखी भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या मित्राने नवदाम्पत्याच्या चेहऱ्यांचा कायमस्वरूपी टॅटू थेट आपल्या छातीवर गोंदवून घेतला. हा प्रकार पाहून दाम्पत्याची प्रतिक्रिया आणि विशेषतः नवऱ्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्य नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती आधी नवविवाहित जोडप्याला त्यांचे चित्र असलेले एक स्केच भेट म्हणून देताना दिसतो. स्केच पाहून दोघेही आनंदी होतात. मात्र, त्यानंतर तो व्यक्ती आपला शर्ट काढतो आणि आपल्या छातीवर त्याच चित्राचा कायमस्वरूपी टॅटू असल्याचे दाखवतो. या टॅटूमध्ये नवरा आणि त्याच्या पत्नीचे चेहरे स्पष्टपणे दिसतात.
हे अनोखे सरप्राइज पाहून नवऱ्याच्या चेहऱ्यावर आधी आनंद, त्यानंतर आश्चर्य आणि काहीसा अस्वस्थपणा स्पष्टपणे दिसतो. हाच रिअॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ ‘X’वरील @ThenNowForeve या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये मित्राच्या भावना मनापासून असू शकतात. मात्र, नवऱ्याने आपल्या पत्नीचा कायमस्वरूपी टॅटू मित्राच्या छातीवर पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे असल्याचे म्हटले आहे.
Friend tattooed his friend and his wife on his chest
The friend’s emotions might genuinely be pure and heartfelt, but look at the husband’s face the moment he sees his wife permanently tattooed on his friend’s chest.
Bro went from “aww, that’s wholesome” to “wait… why exactly… pic.twitter.com/mkSiDpKSgO
— Ritik (@ThenNowForeve) August 24, 2026
व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला मैत्रीचे अनोखे प्रतीक म्हटले, तर अनेकांनी हा प्रकार ‘क्रीपी’ आणि अस्वस्थ करणारा असल्याचे म्हटले. एका युजरने म्हटले की, मित्राचा चेहरा टॅटू करून घेणे काही प्रमाणात समजू शकते; मात्र त्याच्या पत्नीचा चेहराही छातीवर गोंदवून घेणे ही वेगळीच गोष्ट आहे. काहींनी भविष्यात या नात्यांमध्ये काही बदल झाले तर या टॅटूचे काय होईल, असा प्रश्नही उपस्थित केला. एका युजरने तर हा टॅटू भविष्यात समस्या निर्माण करू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठे आणि कधी शूट करण्यात आला, तसेच टॅटू करणाऱ्या व्यक्तीचे नवदाम्पत्याशी नेमके नाते काय आहे, याबाबत पोस्टमध्ये अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या अनोख्या लग्नाच्या भेटीने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.


























































