Assembly Election 2027 – उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि पंजाबमध्ये ‘आप’ भाजपला धक्का देणार! वाचा काय सांगतो सर्व्हे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. पंजाबची जनता ‘आप’ला पुन्हा निवडून देण्याच्या विचारात आहे. तर गेली १० वर्षे सत्तेत असलेल्या उत्तर प्रदेशमध्येही भाजपला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. ‘वोट वाइब’च्या ‘स्टेट वाइब सर्व्हे’मध्ये तिन्ही राज्यांतील मतदारांचा कल जाणून घेण्यात आला. या सर्वेक्षणात मतदार कोणत्या पक्षाला मतदान करण्याची शक्यता व्यक्त करत आहेत आणि २०२७ मध्ये कोणत्या पक्षाचा विजय होईल, याबाबतची आकडेवारी समोर आली आहे.

किती मतदारांनी आधीच निर्णय घेतला?

मतदारांना “तुम्ही कोणाला मतदान करणार हे आधीच ठरवले आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर प्रदेशातील ६४.४ टक्के, उत्तराखंडमधील ५२.५ टक्के आणि पंजाबमधील ७१.२ टक्के मतदारांनी आपण कोणाला मतदान करणार हे ठरवले असल्याचे सांगितले.

काही मतदारांची पसंती निश्चित असली तरी त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. उत्तर प्रदेशात असे १९ टक्के, उत्तराखंडमध्ये २५.६ टक्के आणि पंजाबमध्ये १४.७ टक्के मतदार आहेत.

उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षात चुरस

उत्तर प्रदेशात सध्या भाजपला ४१.८ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. तर समाजवादी पक्षला ३८.७ टक्के मतदार मतदान करण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. याशिवाय बसपला ५.२ टक्के, अपक्ष उमेदवारांना ४ टक्के मतदारांची पसंती आहे. तर १० टक्के मतदारांनी अद्याप कोणाला मतदान करायचे हे ठरवलेले नाही.

उत्तराखंडमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत

उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. सर्वेक्षणानुसार ४०.९ टक्के मतदार भाजपला मतदान करण्याची शक्यता व्यक्त करत आहेत, तर ३६.७ टक्के मतदार काँग्रेसच्या बाजूने आहेत.

पंजाबमध्ये ‘आप’ आघाडीवर

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे सर्वेक्षणातून दिसते. ३४ टक्के मतदारांनी आम आदमी पक्षाला मतदान करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काँग्रेसला ३०.२ टक्के, भाजपला १२.२ टक्के, शिरोमणी अकाली दलाला ११.३ टक्के आणि अकाली दल (वारिस पंजाब दे) ला ६.६ टक्के मतदारांची पसंती आहे.

यूपीमध्ये काटे की टक्कर

२०२७ मध्ये उत्तर प्रदेशात विजयासाठी भाजप आणि समाजवादीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त झाली आहे. ४१.२ टक्के मतदारांना समाजवादी पक्ष आघाडी विजयी होईल असे वाटते, तर ४१.१ टक्के मतदारांनी भाजप आघाडीच्या विजयाची शक्यता व्यक्त केली आहे. ‘बसप’ला ४.४ टक्के, तर अपक्षांना २.८ टक्के मतदारांनी विजयाची शक्यता दिली आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपला आघाडी

उत्तराखंडमध्ये ३९.७ टक्के मतदारांना भाजप विजयी होईल असे वाटते, तर ३६.३ टक्के मतदार काँग्रेसच्या विजयाची शक्यता व्यक्त करतात.

पंजाबमध्ये ‘आप’ पुन्हा सत्तेत येणार?

पंजाबमध्ये ३६.७ टक्के मतदारांना आम आदमी पक्ष २०२७ मध्ये पुन्हा सरकार स्थापन करेल असे वाटते. काँग्रेसला २६.८ टक्के, भाजपला १३.६ टक्के, शिरोमणी अकाली दलाला ९.६ टक्के आणि अकाली दल (वारिस पंजाब दे) ला ६.२ टक्के मतदारांनी विजयाची शक्यता दिली आहे.

या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पार्टी आघाडीमध्ये काँटे की टक्कर, उत्तराखंडमध्ये भाजपला आघाडी आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची स्थिती मजबूत असल्याचे सांगण्यात आले आहे.