
नेपाळ आणि लगतच्या तिबेट भागात आलेल्या विनाशकारी महापुरामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकड्यात वाढ झाली असून आतापर्यंत 270 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. अद्याप २८८ हिंदुस्थानी नागरिक बेपत्ता असून गेल्या 24 तासात फक्त २१ हिंदुस्थानींचा शोध लागला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सुरक्षित बाहेर काढण्यात आलेले २१ नागरिक तामिळनाडूचे असून त्यांना मायदेशी परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. बेपत्ता असलेल्या २८८ हिंदुस्थानींमध्ये नेपाळमधील त्रिशुली जलविद्युत प्रकल्पात काम करणाऱ्या ७३ कामगारांचा समावेश आहे. चीनच्या तिबेट सीमेवरही अनेक हिंदुस्थानी अडकले आहेत. २०० हून अधिक हिंदुस्थानीनी मदतीची मागणी केली असून त्यापैकी ९५ जण सध्या दार्चेन (Darchin) भागात सुरक्षित आहेत.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण आपत्तीची तीव्रता अद्याप तपासली जात आहे. नेपाळ आणि तिबेट मिळून सुमारे ८०० परदेशी नागरिकांसह जवळपास १,५०० लोक बेपत्ता आहेत, तसेच हजारो कुटुंबे बेघर झाली आहेत. तेथे सध्या युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे.


























































