
दिल्लीतील टिळक नगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 21 वर्षीय मॉडेलची जिम ट्रेनरने घरात घुसून हत्या केली. घटनेला 20 तास उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे. मुस्कान असे मयत मॉडेलचे तर इम्रान असे आरोपीचे नाव आहे. प्रेमसंबंधातील दुराव्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मुस्कान आणि इम्रान एकमेकांना वर्षभरापासून ओळखत होते. दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. मुस्कानला इम्रानशी असलेले नाते तोडायचे होते. इम्रान मुस्कानसोबतचे आपले नाते सुधारण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता. दरम्यान, मुस्कान दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध ठेवत असल्याचा त्याला संशय येऊ लागला होता. यामुळे दोघांमध्ये वाद आणि संघर्ष वाढत गेला, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनेच्या काही दिवसांपूर्वी ते दोघे एका रेस्टॉरंटमध्ये भेटले होते आणि त्यांच्यात संभाषण झाले होते. तेव्हापासून मुस्कान इम्रानकडे सातत्याने दुर्लक्ष करत होती. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी मुस्कान घरी एकटी असल्याचा फायदा घेत इम्रान तिला जाब विचारण्याच्या उद्देशाने तिच्या घरी गेला आणि दोघांमध्ये वाद झाला. या वादातून इम्रानने मुस्कानची हत्या केली.
प्राथमिक माहितीनुसार, याच संघर्षादरम्यान मुस्कानची हत्या करण्यात आली. घटनेनंतर आरोपी इम्रान घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांवरून पुढील कारवाई केली जाईल.

























































