
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून अनेक हिंदुस्थानी नागरिक अडकले आहेत. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी 27 ऑगस्टला या परिस्थितीबाबत महत्त्वाची माहिती दिली. मंत्रालयाच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये 288 हिंदुस्थानी नागरिक संपर्काबाहेर असून आतापर्यंत 21 जणांची सुटका करण्यात आली आहे. अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले सुमारे 200 हिंदुस्थानी नागरिक चीनच्या बाजूला अडकले असून त्यांनी मदतीची विनंती केली आहे. चीनमधील हिंदुस्थानी मिशन स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. ईशा फाउंडेशनचे काही सदस्यही तेथे अडकले असल्याची माहिती त्यांनी दिली.
एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये संपर्काबाहेर असलेल्या हिंदुस्थानींमध्ये विविध राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये त्रिशूली-1 पॉवर प्रोजेक्टवर काम करणाऱ्या 73 जणांचा एक गट आहे. त्याशिवाय तमिळनाडूतील 37 आणि 49 नागरिकांचे दोन गट, पश्चिम बंगालमधील 32 नागरिकांचा गट , विविध राज्यांतील 61 नागरिकांचा गट आणि केरळमधील 33 नागरिकांचा गट असल्याचे सांगण्यात आले.
पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानाने नेपाळला मदत पाठवली आहे. हिंदुस्थानकडून दोन विमानांमधून मोठ्या प्रमाणात मदत सामग्री पाठवण्यात आली आहे. पहिल्या विमानातून 10 टन मदत सामग्री पाठवण्यात आली, तर दुसरे विमान 37.5 टन मदत सामग्रीसह रवाना झाले. यामध्ये सुमारे 8 टन औषधांचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
नेपाळ सरकारच्या विनंतीनुसार ही मदत पाठवण्यात येत आहे. बचाव आणि मदतकार्याला हातभार लावण्यासाठी हिंदुस्थानकडून बेली ब्रिज तयार करण्याचे कामही सुरू असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. अडकलेल्या हिंदुस्थानींच्या नातेवाईकांना माहिती मिळावी आणि मदतकार्याचे समन्वय साधता यावे यासाठी परराष्ट्र मंत्रालयात 24 तास कार्यरत कंट्रोल रूम सुरू करण्यात आली आहे. काठमांडू आणि बीजिंग येथील हिंदुस्थानी दूतावासांनीही 24/7 हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी संबंधित राज्य सरकारांशीही समन्वय साधला जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. दरम्यान, नेपाळमधील पुरामुळे आतापर्यंत 270 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून एक हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.




























































