नेपाळमधील पुरानंतर बिहारमध्ये हाय अलर्ट, गंडक नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमधील तिबेट सीमेजवळ बुधवारी भोटे कोशी नदीला आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. या पुरात किमान १६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमध्येही संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंडक नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या भागांमध्ये सतर्कता वाढवली आहे.

पश्चिम चंपारणचे जिल्हाधिकारी तरणजोत सिंह यांनी सांगितले की, तिबेट आणि नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर वाल्मीकिनगर बॅरेजसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी सतर्क आहेत. प्रशासनाने विविध तटबंदी आणि वाल्मीकिनगर बॅरेजची पाहणी केली आहे.

नेपाळमधील देवघाट परिसरातून पाण्याचा प्रवाह पुढे सरकला असून हे पाणी सकाळी सुमारे ९ वाजता वाल्मीकीनगर बॅरेजपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाखाली राहण्याची शक्यता असून परिस्थिती सध्या नियंत्रणात राहील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गंडक नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क करण्यात आले आहे. संभाव्य पाणीवाढीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या सर्व भागांमध्ये प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत.

उत्तर प्रदेशातही हाय अलर्ट

नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानंतर राज्यातील संभाव्य पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मदत आयुक्त कार्यालयाकडून २४ तास देखरेख केली जात आहे.

नेपाळमधील परिस्थितीचा परिणाम उत्तर प्रदेशातील नदीपात्र आणि सीमावर्ती भागांवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नेपाळ आणि तिबेट सीमावर्ती भागातील पूरस्थितीवर बिहार तसेच उत्तर प्रदेश प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.