
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात गुरुवारी सशस्त्र बंडखोरांनी एका वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात चार जण ठार झाले आणि एक जण बेपत्ता झाला आहे. माकुई अशांग आणि थाबांबा नागा दरम्यान एका निर्जन भागात ही घटना घडली. या घटनेमुळे या भागातील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. मयत चौघेही लियांगमाई नागा समुदायातील होते आणि हल्ल्यानंतर त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह सेनापती जिल्हा रुग्णालयात नेले जात आहेत.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेनंतर नागा पीपल्स ऑर्गनायझेशनने सेनापती जिल्हा मुख्यालयातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले. अधिकारी या हल्ल्याबाबत सविस्तर तपास करत असून बेपत्ता व्यक्तीचाही शोध सुरू आहे. सुरक्षा दलांनी पूर्व इम्फाळ जिल्ह्यात विविध प्रतिबंधित संघटनांशी संबंधित असलेल्या तीन संशयित बंडखोरांना अटक केल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे.



























































