
गुहागर आणि चिपळूण तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या केरे हद्दीत गुरुवारी पहाटे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गुहागर तालुक्यातील तवसाळ येथून श्रीवर्धनकडे स्टीलचे अवजड साहित्य घेऊन जाणारा मोठा ट्रेलर कापशी पुलाच्या वरील सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका अवघड वळणावर अडकला.
या मोठ्या ट्रेलरमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि चढणीच्या अवघड वळणावर ट्रेलरला चढता न आल्याने हा ट्रेलर रस्त्यामध्येच अडकून पडला. रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि प्रवाशांना काही तास मनस्ताप सहन करावा लागला. यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळताच सावर्डे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करून अडकलेला ट्रेलर बाजूला काढला आणि काही तासांनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी आबलोली येथील पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.


























































