
पावसाचा एक थेंबही कोसळला नसताना नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे अवघे जग चक्रावून गेले आहे. मात्र, महापुरानंतर काही तासांतच या प्रलयामागील खरे कारण समोर आले आहे. नेपाळ-तिबेट सीमेवरच्या अति उंच पर्वतरांगांमधून वाहणाऱ्या हिमनदीतून दोन हजार फूट रुंदीचा हिमकडा थेट 4 हजार फूट खाली कोसळला. त्यामुळे बर्फ, दगड, माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा तयार झाला. हा लोंढा 100 फूट उंचीच्या लाटेत रुपांतरित होऊन राक्षसी वेगाने पुढे सरकत त्रिशुली नदीत मिसळला. नेपाळचा डोंगराळ आणि अरुंद भूभाग असल्यामुळे या मलब्याच्या प्रवाहाचा वेग आणखी वाढला. हाहा म्हणता हा लोंढा गावांमध्ये आणि शहरांमध्ये घुसला आणि होत्याचे नव्हते झाले.
कैलास मानसरोवर यात्रेवरून परतणाऱ्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या 80 भाविकांचा गट या जलप्रलयात वाहून गेल्याची भीषण शंका व्यक्त केली जात आहे. तिबेटमधील ‘सागा’ येथील शिबिरातून या दुर्घटनेची माहिती देताना ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांना अश्रू अनावर झाले. यात्रा पूर्ण करून 80 भाविकांचा हा गट तिबेटच्या ‘किरोंग’ भागातील इमिग्रेशन सेंटरमध्ये कागदपत्रांच्या प्रक्रियेसाठी थांबला होता. त्याच वेळी आलेल्या पुराच्या प्रचंड लाटेत संपूर्ण इमारत काही सेकंदात वाहून गेली. सकाळी 9.05 वाजता या 80 भाविकांच्या गटाचे प्रमुख ईशांग प्रवीण यांनी शेवटचा मेसेज केला आणि 9.14 वाजता ही दुर्घटना घडली. त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
हिंदुस्थानकडून नेपाळला मदत
हिंदुस्थानने गुरुवारी सकाळी दिल्लीच्या हिंडन एअरबेसवरून सी-17 लष्करी वाहतूक विमानाद्वारे 35-37 टन मदत सामग्री नेपाळला पाठवली आहे. हिंदुस्थानी वायुसेनेच्या सी-130 जे विमानातून जवळपास 10 टन मानवीय सहाय्य आणि आवश्यक वैद्यकीय सामान काठमांडूला पोहोचवण्यात आले. यात तात्पुरते आवश्यक सामान, चादरी, हायजीन किट, सोलर लॅम्प आणि औषधांचा समावेश होता. मदतीनंतर नेपाळने हिंदुस्थानचे आभार मानले आहेत. या कठीण काळात हिंदुस्थानने दाखवलेली एकजुटता, नेपाळबद्दल केलेली चिंता आणि आवश्यक मदत ही आपत्तीग्रस्त लोकांना प्रोत्साहन देणारी ठरली आहे, असे म्हटले आहे.
पाण्यातून फक्त प्रेते वाहत होती
पूरग्रस्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याचा प्रचंड प्रवाह होता. या पाण्यातून फक्त प्रेते वाहून येत होती. गाडय़ा वाहून येत होत्या. आम्ही डोंगरावर असल्याने बचावलो. आमची जनावरे पाण्यात वाहून गेली. आम्ही जे दृश्य पाहत होतो ते कधीच पाहिले नाही. काही लोक म्हणत होते, चीनचा डॅम फुटला म्हणून पाणी आले.
पाच जिह्यांना ‘हाय अलर्ट’
काठमांडूच्या उत्तर पूर्वेला असलेल्या रसुवा जिह्यात मोठी हानी झाली आहे. या जिह्यापासून तिबेटची सीमा अवघ्या 125 किमी दूर आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती विभागाने रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित जागी जावे, असे आदेश देण्यात आले आहेत.



























































