
प्रकृती गंभीर झाल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात आलेल्या ज्येष्ठ महिलेचा उपचाराअभावी ससून रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रेन स्ट्रोकचा झटका आलेल्या या महिलेला बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत तब्बल दोन तास रुग्णवाहिकेमध्ये ताटकळत ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
वाघोली येथील रहिवाशी असलेल्या लक्ष्मीबाई बाबर या ज्येष्ठ महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात आणण्यात आले. मात्र रुग्णालय प्रशासनाने बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. महिलेच्या मुलाने वैद्यकीय अधीक्षकांशी संपर्क साधून रुग्णाला तातडीने दाखल करून घेण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही रुग्णाला दाखल करून घेण्यात आले नाही. परिणामी उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाला.


























































