मुंबईत फ्लॅटमध्ये ड्रग्ज तयार करणाऱ्या सहा जणांना दणका, न्यायालयाने ठोठावली 20 वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील ओशिवरा परिसरातील एका फ्लॅटमध्ये मेफेड्रोन ड्रग्ज तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांना मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने सहा आरोपींना 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सचिन बागुल, साजिद इलेक्ट्रिकवाला, चंद्रकांत कटाडे, राहुल साळुंके, अयूब खान आणि भानुदास मोरे ऊर्फ भावेश पटेल अशी या आरोपींची नावे असून विशेष न्यायाधीश एस.एम. बुके यांनी आरोपींना दोषी ठरवले आहे.

29 जून 2015 रोजी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ओशिवरा येथील हॉटेल श्रीजीजवळ सचिन बागुल याला एक किलो मेफेड्रोनसह अटक केली होती. त्याच्या चौकशीत ओशिवरा येथील एका फ्लॅटमध्ये ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला असता 25.5 किलो तयार एमडी, 25 किलो अर्धवट तयार ड्रग्ज आणि 100 लिटर रसायने जप्त करण्यात आली. या प्रकरणात अॅड. अवधूत चिमलकर यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद करत 44 साक्षीदारांची तपासणी केली. भानुदास मोरे ऊर्फ भावेश पटेल हा या टोळीचा मुख्य सूत्रधार होता. त्याने अन्य आरोपींना मेफेड्रोन तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते. आरोपी गुजरातमध्ये जाऊन मेफेड्रोन निर्मितीचे प्रशिक्षण घेऊन आले होते आणि त्यानंतर त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ओशिवरा येथील फ्लॅटमध्ये गुप्त प्रयोगशाळा उभारली. न्यायालयाने नमूद केले की, आरोपींनी रासायनिक क्रियेसाठी अनुकूल वातावरण तयार करून त्या ठिकाणी ड्रग्जचे उत्पादन केले होते. सरकारी पक्षाने आरोपींविरोधातील आरोप पुराव्यांच्या आधारे सिद्ध केले असून आरोपींना दिलासा देता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.