
रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी बुधवारी रात्री ज्ञानेश्वर नगर येथे लावलेल्या नाकाबंदी वेळी अनुचित घटना घडली. दुचाकीवरून ट्रिपल सीट आलेल्या चालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला तरी त्याने न थांबता पोलीस निरीक्षक व वरिष्ठ निरीक्षकाला धडक दिली. यात दोन्ही अधिकाऱ्यांना दुखापत झाली. पोलिसांनी दुचाकीवरील तिन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
शिवडीच्या ज्ञानेश्वर नगर येथे झकेरिया बंदर रोडकडून वडाळा रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या चार रस्त्यावर आर.ए.के. मार्ग पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. या वेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर पोलीस कारवाई करत होते. दरम्यान त्या वेळी एक दुचाकी मोठा आवाज करत तेथे आली. वेगात असलेल्या त्या दुचाकीवर तिघे तरुण बसलेले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. पण त्यांनी तो इशारा धुडकावून लावत दुचाकी तशीच पुढे दामटवली आणि पुढे जाऊन पोलीस निरीक्षक कुंवर आणि वरिष्ठ निरीक्षक विनोद तावडे यांना धडक दिली. यात कुंवर यांच्या पायाला तर तावडे यांच्या कपाळ व पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी दुचाकीचालक इब्राहिम तांबोळी (20), निखिल जयस्वाल (22) आणि अरमान खान (23) अशा तिघांविरोधात आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.




























































