
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना 31 जुलै 2026पर्यंत सर्व 27 वस्तू देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ऑगस्ट संपत आला तरी बऱयाचशा शाळांमध्ये वह्या पोचलेल्या नाहीत. पावसाळा उलटला तरी रेनकोट, छत्र्या मिळालेल्या नाहीत. पुरवठादाराची पाठराखण केली जात आहे. त्याला कोणताही दंड लावला जात नाही. उलट दरवेळी गोलमाल उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱया पालिका प्रशासनाला आज शिवसेनेने जाब विचारला. या प्रश्नी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत शिक्षण समितीच्या बैठकीतून वॉकआऊट केले.
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 27 शालेय वस्तूंची खरेदी यंदा प्रथमच केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून करण्यात येत आहे. मात्र ही प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यामुळे यंदा वस्तू मिळण्यास उशीर झाला आहे. अनेक विद्यार्थी शालेय वस्तूपासून वंचित राहिले आहेत. याबद्दलचा हरकतीचा मुद्दा शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी उपस्थित केला. अनेक शाळांमध्ये वह्या पोचल्या नसल्याचे अंकित प्रभू यांनी निदर्शनास आणून दिले. युनिफॉर्म, छत्र्या, रेनकोटही मुलांना मिळालेले नाहीत. सहामाही परीक्षा येईल, मुले अभ्यास कधी करणार? असा सवाल प्रभू यांनी विचारला. नगरसेवक प्रमोद सावंत यांनी मुलांना सगळ्या वस्तूंचा पुरवठा होईपर्यंत ऑक्टोबर येईल, अशी शंका उपस्थित केली.
अजब दावा… युद्धामुळे छत्र्या पोचल्या नाहीत
वह्या आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप पूर्ण झाले नसल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली. एकूण 2 लाख 94 हजार 274 वह्यांचे वाटप करायचे होते. त्यापैकी 2 लाख 68 हजार 608 वह्या मुलांना देण्यात आल्या आहेत. स्कूल बॅगचे वाटप 61.80 टक्के तर छत्र्यांचे वाटप 51 टक्के झाले आहे. युद्धामुळे छत्र्या पोचण्यास उशीर झाल्याचे पुरवठादाराचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले. वस्तूंच्या विलंब प्रकरणी पुरवठादारांना दंड लावूनच पेमेंट केले जाईल, असे त्यांनी सांगितले.




























































