
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा शक्तिपीठ महामार्ग आहे. पण या महामार्गाच्या संयुक्त जमीन मोजणीला विरोध होत आहे, पण शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून जमीन मोजणीला गती द्यावी. राज्यात 2031 पर्यंत राज्यात सहा हजार किमी लांबीचे ‘एक्सप्रेस वे’चे जाळे उभारण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (एमएसआरडीए) डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
एमएसआरडीएच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)च्या पुण्यातील सभागृहात महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भातील भूसंपादनाबाबत महसूल विभागाच्या यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी सातत्याने संवाद ठेवत भूसंपादन प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन यावेळी अनिलकुमार गायकवाड यांनी केले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग हा 856.57 किमी. लांबीचा असून हा महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा आहे. राज्यातील 21 देवस्थाने शक्तिपीठ महामार्गाने जोडली जाणार आहेत. सुधारित आखणीनंतर तेरा जिल्हय़ांना थेट जोडणी होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग महत्त्वपूर्ण असून त्यात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिह्यातील 50 टक्के जमीन आहे. राज्य सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समन्वय ठेवण्याचे आवाहन डॉ. गायकवाड यांनी यावेळी केले.




























































