
लोकसभेतील सध्याचे राज्यनिहाय संख्याबळ कायम ठेवून एकूण सदस्य संख्या पुढील 25 वर्षांसाठी 543 एवढीच ठेवावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मतदारसंघ फेररचनेवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणीदेखील केली आहे.
खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना जनगणनेसंदर्भात प्रश्न लिहिले होते. त्यात जनगणनेची प्रश्नावली बदलण्याची मागणी या पत्रातून केली होती. आता खरगे यांनी मतदारसंघ फेररचनेबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यात खरगे यांनी म्हटले, की परिसीमनवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. परिसीमनाच्या प्रस्तावांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा. सध्या लोकसभेतील विद्यमान 543 संख्याबळ पुढील 25 वर्षे कायम ठेवावे. त्यातूनच 2029च्या लोकसभा निवडणुकीत एक तृतियांश महिला आरक्षण लागू करावे, अशी मागणी खरगे यांनी केली आहे.
खरगे यांचे दुसरे पत्र
खरगे यांचे या विषयावर दुसरे पत्र आहे. त्यांनी यापूर्वी 16 जुलै रोजी पत्र लिहून सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली होती. आता त्यांनी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या एका मुलाखतीचा संदर्भ देऊन पत्र लिहिले आहे. रिजिजू यांनी संसदेचे एक विशेष सत्र बोलावण्याचे संकेत दिल्याचे म्हणत खरगे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची पुन्हा मागणी केली.





























































