IND Vs SL – श्रीलंकेत लाज गेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रसाद रमेश लाड<<

फक्त चार विकेट्स आणि टीम इंडिया दुसरी कसोटीही जिंकणार, असे छाती ठोकून हिंदुस्थानचे चाहते सांगत होते, पण फक्त एकटा सोनल दिनुशा टीम इंडियावर भारी पडला. फॉलोऑन देऊन टीम इंडियावर ही सर्वात मोठी नामुष्कीची वेळ आली आणि श्रीलंकेत लाज गेली. 90 षटकांमध्ये चार विकेट्सही न मिळवता येणं, यावर आता अजित आगरकर आणि गौतम गंभीर काय कारण देणार? वरिष्ठ खेळाडूंना संघाबाहेर करायचा विडा त्यांनी उचललाच आहे. पण कठीण परिस्थितीमधून अनुभवच तारून नेतो, हे ते सोयिस्करपणे विसरले असावेत.

गेल्या दोन वर्षांतल्या टीम इंडियाची कसोटीमधली कामगिरी जरा पाहा. गेल्या दोन वर्षांत टीम इंडियाने जे विजय मिळवले आहेत, ते अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांविरुद्ध मिळवलेले आहेत. पण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका या बलाढय़ संघांबरोबर टीम इंडियाची पुंगी वाजलेली आहे. गंभीर यांची वाजतगाजत टीम इंडियामध्ये एंट्री झाली खरी, पण कसोटीमध्ये त्यांना हिंदुस्थानला यश मिळवून देता आले नाही. फक्त टी-20 आणि वन डे म्हणजेच क्रिकेट नव्हते, हे त्यांनाही सांगणे न बरे. अजित आगरकर यांचा तर कालावधी संपायला आला, पण तरीही कसोटी संघासाठी त्यांना चांगले खेळाडू काही निवडता आले नाहीत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघाबाहेर केले. मोहम्मद शमीवर अघोषित बंदी घातली. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांचा गेम केला. युवा खेळाडूंना संघात घेतलं, पण त्यांना वाट दाखवणारा, अनुभवाचे बोल शिकवणारा एकही खेळाडू त्यांनी संघात ठेवला नाही आणि हेच टीम इंडियाच्या कसोटीमधील अपयशाचं सार आहे. कसोटीलाच खरं क्रिकेट का म्हटलं जातं, कारण तिथे फक्त चौकार-षटकार चालत नाहीत, तिथे संयम लागतो. भागीदारी करावी लागते. खेळपट्टीवर उभं राहावं लागतं. विकेट्स काढाव्या लागतात. कसोटी क्रिकेट तुमची परीक्षा प्रत्येक क्षणाला घेत असते, त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अनुभव लागतो. जेव्हा विकेट्स मिळत नाही, तेव्हा काय करायचं हे तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही, हे शुभमन गिलने प्रथम समजून घेण्याची गरज आहे. टी-20मध्ये एखादा चुकीचा निर्णयही तारून नेऊ शकतो, पण कसोटीमध्ये एखादा निर्णय होत्याचं नव्हतं करून देणारं ठरतं.

रवींद्र जाडेजाबरोबर मानव सुथारला उतरवलं, तोपर्यंत ठीक होतं. पण पुलदीप यादववर अविश्वास दाखवणं, यावेळी संघाला भारी पडलं. पहिल्या कसोटीत जास्त गोलंदाजी न देता त्याचा काटा काढला आणि सारांश जैनसारख्या नवख्या खेळाडूला त्यांनी संघात आणलं. पण गौतम गंभीर आणि गिल यांची ही रणनीती पुरती फसली. संघ निवडीचे आणि मैदानातले निर्णय हे सतत चुकत गेल्याचा परीपाक टीम इंडियाला विजयापासून दूर घेऊन गेला.

टीम इंडिया विजयाच्या उंबरठय़ावर होती, पण त्यांना दारामधून पुढे प्रवेश करता आला नाही. कारण विजयाच्या दारावर सोनल दिनुशासारखा श्रीलंकेचा तारणहार उभा होता. पहिल्या कसोटीत तो चमकला होता. या कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने जबरदस्त धावा केल्या, पण त्याला बाद करण्याची कोणतीही खास रणनीती टीम इंडियाकडे नव्हती. संपूर्ण पहिल्या सत्रात एकही विकेट मिळवता न येणं, यावरून गोलंदाजीला किती धार आहे, हे समजू शकतं.

ही बरोबरी नाही, तर टीम इंडियाची हारच आहे. कारण सामना अनिर्णित राहण्याच्या जखमा टीम इंडियाच्या चाहत्यांच्या अंगावर भळभळत आहेत, पण त्यावरचे मलम आगरकर आणि गंभीर यांच्याकडे नाही. गिलला तर विचारूही नव्हे. कारण कसोटीला लागणारे नेतृत्व त्याच्याकडे नाही, ही खरी गोष्ट आपण मान्य करायला हवी. पण त्याची जागा जाणार नाही आणि गेली तर त्याची जागा घेणारा चेहरा संघात दिसतोय का? तुम्ही वरिष्ठ खेळाडूंना संघाबाहेर काढताना त्यांची जागा कोण घेणार, याची तरतूद प्रथम करायची असते, हे आगरकर आणि गंभीर विसरले आणि त्याचाच परिणाम आता पाहायला मिळत आहे. जसा टी-20 आणि वन डे वर्ल्ड कपचा विचार होतो, तसा कसोटी क्रिकेटचा विचारही बीसीसीआयने करायला हवा. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडिया पोहोचू शकणार नाही, असं चित्र सध्या दिसतंय. पण हे चित्र बदलू शकतं, पण त्यासाठी तुम्ही कधी बदलता, याचा विचार आगरकर आणि गंभीर यांनी करायला हवा. तरच कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांसमोर आपण उभे राहू अन्यथा अफगाणिस्तानसारख्या देशांवर विजय मिळवून मर्दुमकी गाजवण्याची वेळ गंभीर यांच्यावर आल्यावाचून राहणार नाही.