
आपल्या हिंदू धर्मातील वर्षभरात येणारे सण आपल्या पूर्वजांनी अतिशय विचार करून योजले असावेत. विशेष म्हणजे आपल्या संस्कृतीत वर्षभर सण, उत्सवांची रेल असते; त्यामुळे आपल्याला ते सण कोणाचे आहेत हे लक्षात राहावेत म्हणून की काय, आपल्या पूर्वजांनी त्यांची नावेच अशी दिली आहेत की, त्या नावातच कशाचा सण आहे, हे सहज लक्षात येते. उदाहरणच द्यायचं झालं तर गुढीपाडव्याला गुढी उभारायची, वटपौर्णिमेला वडाची पूजा, नागपंचमीला नागाची पूजा, तर रंगपंचमीला रंगांची उधळण. या प्रकारे सणांच्या नावांतच त्यांचे महत्त्व आहे.
‘रक्षाबंधन’ या नावातच बंधन आहे रक्षा करण्याचं, प्रेमाने सुरक्षित ठेवण्याचं बंधन. पूर्वी भाऊ बहिणीला हे वचन द्यायचा. आताही ती परंपरा सुरूच आहे. द्रौपदीने श्रीकृष्णाच्या बोटाला चिंधी बांधली आणि त्या बंधनाची परतफेड श्रीकृष्णाने द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तिला सुरक्षित ठेवून केली.
बहिणीने भावाला राखी बांधण्याचा हा संस्कार आईवडील करतात. यातून भावाने बहिणीची रक्षा करावी हेच जणू सांगितले जाते. नकळत आपल्या मुलीची सुरक्षा आपल्या मुलाकडे देण्याचा हा संस्पृतीचा ठेवा आहे आणि तो योग्यही आहे.
पण काळ बदलला आहे. मला वाटतं पूर्वी महिला, मुली या शांत, संयमी आणि काहीशा घाबरट असल्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी भावांकडे दिली जात होती. अर्थात आताही ती आहेच, पण मला वाटतं, रक्षा करण्याचं बंधन हे केवळ पुरुषांकडे किंवा भावांकडेच नसावं.
आजच्या काळात प्रत्येक महिलेला सुरक्षित ठेवण्याचे बंधन आपल्या सगळ्यांचेच आहे. कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी प्रत्येक महिला सुरक्षित असावी. तिच्या रक्षेचे बंधन ही सर्वांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. हे रक्षाबंधन केवळ महिलांसाठीच नसावे. समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीची रक्षा करणे आपल्या सगळ्यांवर बंधनकारक असावे.
आपल्या परिसरातील वृद्ध, अनाथ मुले यांचेदेखील आपण शारीरिक रक्षण त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन करू शकतो. वृद्धाश्रमातील, अनाथाश्रमातील मुलामुलींना किंवा वृद्धांना मानसिक, भावनिक आधार देऊन किंवा शक्य झाल्यास आर्थिक आधार आपण देऊ शकतो. त्यांना कोणी नाही या भावनेने दुखावलेले असतात. अशा वेळी आपण त्यांना भावनिक रक्षाबंधन करावे. त्यांच्यासाठी महिन्यात एक किंवा दोन तास आपण वेळ देऊ शकतो. रक्षाबंधन हे केवळ एक दिवसाचे किंवा राखी बांधण्यापुरते नसावे, तर ते एक कायम स्वरूपाचे आश्वासन असावे.
आपल्या राष्ट्रातील सगळ्यांची रक्षा करण्याचे व्रत आपल्या सैनिक, पोलीस, डॉक्टर्स, बस/ रेल्वे/ विमान चालक अशा अनेकांनी घेतलेले आहे. सर्व भविष्य घडवणाऱ्या पिढ्यांना विधायक शिक्षण, संस्कार देणाऱया सर्व गुरूंनी अनेक पिढ्यांचे ‘रक्षाबंधन’ व्रत घेतलेले आहे.
या सर्वांचा आदर्श आपणही घेऊ या. प्रत्येक गरजूंचे रक्षण करण्याचा प्रयत्न करू या. केवळ व्यक्तीच नाही, तर आपल्याला भरभरून देणाऱ्या, पण त्या मोबदल्यात कशाचीही अपेक्षा न करणाऱ्या वृक्ष, डोंगर, नद्या, पर्वत इत्यादी निसर्गाच्या घटकांचे रक्षाबंधन करू या. त्याचप्रमाणे आपल्या ऐतिहासिक भूमी, वास्तू, शिल्प इत्यादी सगळ्यांचेच रक्षाबंधन स्वतःवर घालू या. सर्वात महत्त्वाचं आपल्या संस्कृतीचं, सांस्कृतिक मूल्यांचं जतन करून तो वारसा, तो आदर्श आपण पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत संक्रमित करण्याचं रक्षाबंधन स्वतःवर घालू या. या वर्षापासून असेही रक्षाबंधन साजरे करू या.
सीमा श्रीराम शास्त्री मोडक
(लेखिका मुख्याध्यापिका आहेत.)






























































