आसिफ खान डोपिंगमध्ये अडकला, 15 महिन्यांच्या बंदीची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) संघाचा अनुभवी फलंदाज आसिफ खान डोपिंगच्या जाळय़ात अडकला असून, त्याच्यावर तब्बल 15 महिन्यांची बंदी लादण्यात आली आहे. स्पर्धेबाहेर घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीत प्रतिबंधित स्टेरॉइड आढळल्याने आयसीसीने ही कठोर कारवाई केली.

गेल्या वर्षी 8 सप्टेंबर 2025 रोजी आसिफची डोपिंग चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत मेस्टेरोलोनच्या मेटाबोलाइटची पुष्टी झाली. टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पदार्थाचा समावेश प्रतिबंधित पदार्थांच्या यादीत आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय आसिफने ICCच्या अँटी-डोपिंग कोडमधील नियम 2.1चा भंग केल्याचे मान्य केले. जागतिक अँटी-डोपिंग एजन्सी (वाडा) आणि आयसीसीसीसोबत झालेल्या करारानुसार त्याने शिक्षा स्वीकारली आहे. आसिफवरील बंदी 8 सप्टेंबर 2025पासून लागू मानली जाणार असून, ती 7 डिसेंबर 2026पर्यंत कायम राहील. मात्र, त्याला 8 ऑक्टोबरपासून संघासोबत सराव करण्याची तसेच क्लब किंवा घ्ण्ण्च्या सदस्य संस्थांच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी असेल. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये मात्र 8 डिसेंबर 2026पासूनच त्याचे पुनरागमन होऊ शकते.