गोवंडीत पालिकेच्या शाळेत बकरी अड्डा, शिक्षण समितीच्या बैठकीत पडसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवंडी, रोड नंबर 8 येथील संजय नगर पालिका शाळेत व्यवस्थापनाला धमकावून बकरे बांधण्यास भाग पाडण्यात आल्याचा गंभीर प्रकार आज मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत उघडकीस आला. शाळा शिक्षणासाठी की पशुपालनासाठी असा सवाल करत सदस्यांनी या विषयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यानिमित्ताने पालिका शाळांतील सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

गोवंडीच्या पालिका शाळेला बकरी अड्डय़ाबाबत शिक्षण समितीचे स्वीकृत सदस्य निखिल व्यास यांनी मुद्दा उपस्थित केला. आता अभ्यासक्रमात ‘ऑनिमल हजबंडरी’ विषयही समाविष्ट करणार आहोत का?’ असा सवाल त्यांनी विचारला. शिवसेनेने पालिका शाळेतील ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. सुरक्षा एजन्सीवर कठोर कारवाईची मागणी नगरसेवक प्रमोद सावंत यांनी केली तर पालिका शाळांमध्ये किती सुरक्षारक्षक काम करत आहेत. सुरक्षारक्षकांची संख्या पुरेशी आहे का, यासंदर्भातील ऑडिट करण्याची मागणी नगरसेवक अंकित प्रभू यांनी केली. नगरसेविका स्वप्ना म्हात्रे आणि योगिता कोळी यांनी गोवंडी शाळा प्रकरणात संबंधितांवर तत्काळ कारवाईची मागणी केली.