ऐन सणासुदीत साखर खरेदीचे वांदे; ब्लिंकिट, झेप्टोतून 5 किलोपेक्षा जास्त साखर आता मिळणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात साखर 80 रुपयांपेक्षा जास्त महाग झाली असतानाही आता साखर खरेदी करण्याचे वांदे झाले आहेत. देशात साखरेचा साठा कमी झाल्यामुळे आता ऑनलाइन प्लॅटफॉर्म ब्लिंकिट, झेप्टोसारख्या अॅप्सवरून आता ग्राहकांना केवळ 2 ते 5 किलोपर्यंतच साखर खरेदी करता येणार आहे. ऑनलाइन क्वीक कॉमर्स अॅपसह मोठय़ा सुपर मार्केटस्नी साखर खरेदीवर मर्यादा घातली आहे.

मुंबईत साखर 75 ते 80 रुपये प्रति किलो मिळत आहे. 26 जुलै रोजी साखर 48 रुपये किलोने विकली जात होती. अवघ्या महिन्याभरात साखरेचे भाव प्रचंड वाढले आहेत. 20 जुलै ते 20 ऑगस्ट या कालावधीतच साखरेचे दर 16 टक्क्यांपर्यंत वाढले होते, जे ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत आणखी वाढले. रक्षाबंधन आणि आगामी गणेशोत्सव, नवरात्री व दिवाळी यांसारख्या सणांच्या काळात मिठाई आणि साखर-आधारित पदार्थांची मागणी खूप वाढते. अशा वेळी साखरेच्या किमतीत प्रति किलो 17 रुपयांपर्यंत वाढ झाल्याने सामान्य कुटुंबांच्या महिन्याच्या रेशनच्या बजेटवर थेट परिणाम होत आहे. घाऊक बाजारातही साखर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने आता घराघरात दररोज लागणारा चहा कडू झाला आहे.

डीमार्ट, रिलायन्स रिटेलवरही मर्यादा

ऑफलाइन बाजारात डीमार्ट आणि रिलायन्स रिटेलसारख्या सुपरमार्पेटनेही प्रत्येक ग्राहकांना केवळ 2 ते 3 किलो साखर खरेदी करण्याची मर्यादा घातली आहे. ब्लिंकिटवर एकाच वेळी जास्तीत 5 किलो, स्विगी इन्स्टामार्टवर 5 किलोपर्यंत, बिगबास्केटवर जास्तीत जास्त 6 किलो आणि डीमार्ट व रिलायन्सवर 2 ते 3 किलो साखर मिळू शकेल. यापेक्षा जास्त खरेदी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे.