शिक्षकाच्या मोटारीने सहा विद्यार्थ्यांना उडविले, श्रीरामपूर तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या भरधाव कारने उडविले. श्रीरामपूर तालुक्यातील ब्राह्मणगाव वेताळ-शिरसगाव मार्गावर आज हा अपघात घडला. या अपघातात ब्राह्मणगाव वेताळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमी विद्यार्थ्यांवर लोणी येथील प्रवरा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केशव आकाश बर्डे (वय 6), आकांक्षा आकाश बर्डे (वय 9), वैभव अमोल बर्डे (वय 6), प्रीती अमोल बर्डे (वय 8) प्रांजल बाळासाहेब तोरणे (वय 7), श्रद्धा बाळासाहेब तोरणे (वय 12) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

माळेवाडी येथील हायस्कूलमधील शिक्षक मोटारीने शिरसगावच्या दिशेने जात असताना शाळेपासून काही अंतरावर हा अपघात झाला. शाळा सुटल्याने विद्यार्थी रस्त्याने घरी जात असतानाच भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. धडकेनंतर विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेल्याने घटनास्थळी एकच आरडाओरडा झाला. ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले. दोन विद्यार्थ्यांची प्रकती चिंताजनक आहे.