फुप्फुसात अडकली चिकूची बी; तीन महिन्यांनंतर डॉक्टरांनी काढली, नवी मुंबईत पार पडली शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिकू खात असताना फुप्फुसात अडकलेली चिकूची बी तब्बल तीन महिन्यांनंतर बाहेर काढण्यात खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे ३८ वर्षीय रुग्णाची जीवघेण्या त्रासातून सुटका झाली असून आता त्याला पुन्हा मोकळा श्वास घेता येऊ लागला आहे.

उलबे येथील प्रसाद नाखवा (३८) हे चिकू खात असताना चिकूची बी त्यांच्या फुप्फुसात अडकली. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. सुरुवातीला विविध ठिकाणी उपचार घेतल्यानंतर औषधांनी काही काळ आराम मिळाला; मात्र त्रास पूर्णपणे दूर झाला नाही. त्यानंतर मेडिकव्हर हॉस्पिटलमधील फुप्फुसरोग तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल आणि डॉ. तनय सिन्हा तसेच भूलतज्ज्ञ डॉ. शहाबुद्दीन यांच्या पथकाने रुग्णाची तपासणी केली. एचआरसीटी स्कॅनमध्ये डाव्या मुख्य श्वासनलिकेत अरुंदपणा आढळला. मात्र हा अरुंदपणा कफामुळे आहे की अन्य कारणामुळे, हे स्पष्ट होत नव्हते. ब्रॉन्कोस्कोपीमध्ये त्यांच्या श्वासनलिकेत चिकूची बी अडकलेली असल्याचे आढळून आले.

जेवताना बोलू नका

ब्रॉन्कोस्कोपीच्या माध्यमातून ही बी बाहेर काढण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांत रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांनी दैनंदिन कामांना हळूहळू सुरुवात केली आहे. हा धोका टाळण्यासाठी जेवताना बोलणे किंवा हसणे टाळण्यात यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.