
रायगडात स्त्रीशक्तीने कमाल केली असून बचत गटांतील महिलांनी १ लाख ५३ हजार ५४१ गणेशमूर्ती घडवल्या आहेत. त्यात एकट्या पेणमधील महिलांचा वाटा ९४ टक्के आहे. त्यामुळे सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातील २४७ महिला बचत गटांनी या उपक्रमात भाग घेतला. महिलांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. माती कालवण्यापासून ते गणपतीची मूर्ती प्रत्यक्षात घडवणे, रंग तयार करणे, मुकुट, डोळे, कान आदींचे प्रशिक्षण या महिलांना तज्ज्ञांकडून देण्यात आले. आता सहजपणे या महिला गणपतीच्या सुबक मूर्ती घडवत असून त्यांना हक्काचे उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणपती मूर्तीची संख्या लक्षणीय आहे. पेण तालुक्यात १ लाख ४५ हजार २८४, माणगावमध्ये २ हजार १२५, मुरुडमध्ये २ हजार २१०, खालापूरमध्ये ९५०, उरणमध्ये ६९५, कर्जतमध्ये ६१४, सुधागडमध्ये ६००, अलिबागमध्ये ३२८, श्रीवर्धनमध्ये २४०, रोहामध्ये १९५, पनवेलमध्ये १८०, तळामध्ये १५० तर महाडमध्ये ७० मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. गणपती मूर्तीनिर्मितीच्या उपक्रमामुळे महिलांना केवळ हंगामी रोजगार न मिळता स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळत आहे.
– गणपती मूर्तीनिर्मितीचा हा उपक्रम आगामी काळात आणखी व्यापक करण्यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षण, कच्चा माल, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि विक्री व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यावर भर दिला जाणार आहे.
– ग्रामीण महिलांसाठी हा व्यवसाय अधिक फायदेशीर ठरू शकणार आहे. तयार झालेल्या १ लाख ५३ हजार ५४१ मूर्तीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा असून त्याचा फायदा महिला बचत गटांना होणार आहे.
– मूर्तीनिर्मिती, रंगकाम, सजावट, पॅकिंग आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये महिलांचा सहभाग राहिल्याने स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत.
माझे पती गणपती मूर्ती तयार करायचे. नंतर आम्ही महिलांनी एकत्र येऊन महिला बचतगट स्थापन केला. यांनतर प्रभाग संघात दाखल झालो. बचत गटाच्या माध्यमातून गणपती मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. यासाठी आमच्या कुटुंबाचे तसेच जिल्हा परिषदेचे सहकार्य लाभले. गणेशमूर्ती बनवण्याची कला प्राप्त झाल्याने महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत झाली आहे. – दीपाली पाटील, मरिआई बचत गट
परदेशातही मूर्तीना मागणी
रायगडच्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणपती मूर्तीना देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच परदेशातूनही मागणी मिळत आहे. यंदा २ हजार २५० गणपती मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक महिलांनी तयार केलेल्या मूर्तीना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याचा मार्ग खुला झाला असून भविष्यात या व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.




























































