Nepal flood – नेपाळमधील महापुराचे पाणी हिंदुस्थानातही पोहोचले; उत्तर प्रदेशातील गंडक नदीत आढळले 3 मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळ-तिबेट सीमेवर झालेल्या हिमस्खलनामुळे नेपाळमध्ये अभूतपूर्व जलप्रलय आला असून, मृतांचा एकूण आकडा 469 च्या पार गेला आहे. नेपाळमध्ये आलेल्या या भीषण महापुरामुळे नारायणी नदीच्या वेगवान प्रवाहातून मृतदेह वाहत थेट हिंदुस्थानच्या हद्दीत पोहोचले आहेत. उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल भागात 3 मृतदेह गंडक नदीत तरंगताना सापडले आहेत. हे मृतदेह सुमारे 150 ते 200 किलोमीटर अंतरावरून वाहून आल्याची शक्यता आहे.

हिमालयात बुधवारी झालेल्या विनाशकारी हिमस्खलनानंतर आलेल्या महाप्रलयाचे पाणी हिंदुस्थानपर्यंत पोहोचले आहे. हिंदुस्थानच्या सीमेला लागून असलेल्या नेपाळच्या चितवन जिल्ह्यात सर्वाधिक 132 मृतदेह सापडले आहेत. नेपाळमधील नुवाकोट, धादिंग, चितवन आणि नवलपरासी पूर्व या भागांतून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर नेपाळमधून हिंदुस्थानाच्या हद्दीत वाहून आल्याचा संशय असलेले आणखी तीन मृतदेह गुरुवारी उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील गंडक नदीत आढळले.