
हिंदुस्थानचा तरुण ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने गुरुवारी बुद्धिबळ जगतात नवा इतिहास रचला आहे. ग्रँड चेस टूरचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला हिंदुस्थानी बुद्धिबळपटू ठरला आहे. अंतिम सामन्यात गतविजेत्या फॅबियानो कारुआना विरुद्ध 6 गुणांच्या पिछाडीवरून सनसनाटी पुनरागमन करत 20 वर्षीय ग्रँडमास्टरने हे ऐतिहासिक विजेतेपद आपल्या नावावर केले.
क्लासिकल फेऱ्यांअखेर प्रज्ञानंद 3-9 असा तब्बल 6 गुणांनी पिछाडीवर होता. अंतिम दिवशी विजेतेपदासाठी त्याला चमत्कारिक कामगिरीची गरज होती. प्रज्ञानंदने रॅपिड श्रेणीतील दोन्ही सामने जिंकून 11-9 अशी सरशी घेतली. कारुआनाने दुसरा ब्लिट्झ सामना जिंकत 12-12 अशी बरोबरी साधली. मात्र, प्रज्ञानंदने तिसऱ्या ब्लिट्झ फेरीत बाजी मारत पुन्हा आघाडी घेतली.
अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी फक्त ड्रॉची गरज असताना, प्रज्ञानंदने अतिशय संयमी खेळ करत ‘थ्रीफोल्ड रिपिटिशन’द्वारे सामना टाय केला आणि विजेतेपदावर मोहर उमटवली. एकूण 6 सामन्यांपैकी प्रज्ञानंदने 3 सामने जिंकले, 3 ड्रॉ केले आणि 1 गमावला.
Tamil Nadu CM Vijay congratulates Praggnanandhaa for Grand Chess Tour title win
Read @ANI Story | https://t.co/GjA7Rml11N#RPraggnanandhaa #GrandChessTour #GCT2026 #chess pic.twitter.com/4mkVhVeUwU
— ANI Digital (@ani_digital) August 28, 2026
प्रामाणिकपणे सांगायचे तर, 6 गुणांच्या पिछाडीनंतर आज जिंकण्याची फारशी आशा नव्हती. कारुआनाविरुद्ध एक विजय मिळवणेही कठीण असते. पण रॅपिड आणि ब्लिट्झ फॉरमॅटमध्ये मी केलेल्या सुधारणेमुळेच हे पुनरागमन शक्य झाले, असे विजयानंतर प्रज्ञानंद म्हणाला.
जबरदस्त फॉर्मात
कॅंडिडेट्स स्पर्धेतील पराभवानंतर प्रज्ञानंदने 2026 मध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्याने नॉर्वे चेस स्पर्धेत महान खेळाडू मॅग्नस कार्लसनला दोनदा पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. यानंतर सेंट ल्युईस रॅपिड अँड ब्लिट्झ आणि सिंकफील्ड कपमध्येही त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले. दरम्यान, या ऐतिहासिक विजयामुळे प्रज्ञानंदला 2 लाख डॉलर्स (जवळपास 1.80 कोटी) मिळाले. यासह त्याने 2027 च्या ग्रँड चेस टूरमधील स्थान निश्चित केले आहे.



























































