आमचे मत आम्हाला परत द्या… धाराशिवमध्ये ‘एक खोका, मतदाराला धोका’ बॅनर झळकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ‘मशाल’ चिन्हावर निवडून आलेल्या चार नगरसेवकांनी गद्दारी करून मिंधे गटात प्रवेश केला. नगरसेवकांच्या गद्दारीवरून वातावरण चांगलेच तापले असून, नगरसेवक संतोष ऊर्फ नाना घाडगे यांच्या घरासमोर ‘आमचे मत आम्हाला परत द्या, एक खोका – मतदाराला धोका’ अशा आशयाचे बॅनर लावत या गद्दारीचा निषेध करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाल’ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांनी शिवसेनेशी तसेच मतदारांशी गद्दारी करत मिंधे गटात प्रवेश केला. यावरुन सामान्य मतदारात संतापाचे वातावरण असून, त्यांनी बॅनरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. समतानगर भागातील नगरसेवक संतोष उर्फ नाना घाडगे यांच्या घरासमोर बॅनरबाजी करण्यात आली असून, ‘आमचे मत आम्हाला परत द्या, एक खोका – मतदाराला दिला धोका, हा शिक्का पुसला जाणार नाही, १ कोटीचा गद्दार…’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. यामधून नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत मतदारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.