
नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. नेपाळी लष्कराने रसुवा येथील अप्पर त्रिशुली जलविद्युत बोगद्यात अडकलेल्या ३५० कामगार आणि स्थानिक रहिवाशांची सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यामध्ये ६३ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. जोरदार प्रवाह आणि प्रतिकूल हवामानात ही बचाव मोहीम राबवण्यात आली.
सैन्याने रसुवाच्या विविध भागांतून एकूण ८८३ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. अद्यापही १०० हून अधिक लोक बोगद्यात अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्रिशुली येथील क्रमांक १ सेकंड मूव्हमेंट टॅक्टिकल हेडक्वार्टर्सचे वॉरंट ऑफिसर भक्तजन बसनेत या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.
सेकंड लेफ्टनंट अभिषेक शाही यांच्या नेतृत्वाखाली धुंचे येथील एसक्यूआर बॅरेकमधून आणखी एक बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाने स्याफ्रुबेसी, तिमुरे, मैलुंग, थुलो हाकू आणि हाकुबेसी यांसारख्या असुरक्षित भागांतून ५३३ लोकांची सुटका केली. गुरुवार संध्याकाळपर्यंत, लष्कराने एकूण ८८३ लोकांना रसुवा येथे सुरक्षित स्थळी हलवले होते. पूरग्रस्त आणि धोकादायक भूभागातील ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक होती.


























































