
रत्नागिरीकरांना रस्त्यांवरील खड्डे नवीन नाहीत. मात्र शहरातील खड्डे भरण्यासाठीचे जीओ पॉलिमर इएम ६० हे महागडं तंत्रज्ञान तोट्यात असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेला परवडणार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरील रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेला ६५ हजार रूपये मोजावे लागणार अशी चर्चा आहे.एका ठिकाणाचे खड्डे भरायला ६५ हजार रूपये मोजावे लागणार असतील तर रत्नागिरी शहरातील रस्त्यावरील खड्डे पहाता तोट्यातील रत्नागिरी नगर परिषद किती खड्ड्यात जाईल? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरण्यास सुरूवात केली जाते. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील खड्डा रत्नागिरी नगर परिषदेने भरताना तो नव्या जीओ पॉलिमर इएम ६० तंत्रज्ञानाने भरला गेला.पूर्वी डेब्रिज भरून किंवा डांबराने खड्डे भरले जात होते.आता हे नवे मिक्स्चर वापरून खड्डे भरले जाणार आहेत.प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा रूग्णालयासमोरील रस्त्यावरचा खड्डा बुजवण्यात आला.मात्र या प्रयोगासाठी रत्नागिरी नगरपरिषदेला ६५ हजार रुपयांचा खर्च येणार असल्याची चर्चा आहे.एका ठिकाणी असलेले खड्डे बुजवण्यासाठी ६५ हजार रूपये मोजावे लागले तर शहरातील खड्ड्यांची संख्या पहाता रत्नागिरी नगर परिषदेला हे तंत्रज्ञान आर्थिक संकटात टाकू शकते. त्यातच रत्नागिरी नगर परिषद यापूर्वीच तोट्यात आहे.
जयस्तंभावर रस्त्याची चाळण
रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जयस्तंभ येथे तर रस्त्याची चाळण झाली आहे.बाजारपेठेतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.जिल्हा परिषदेच्या समोरील मुख्य रस्त्यावरील खड्डा वाहनचालकांचे जोरदार स्वागत करत आहे.काही ठिकाणी गाडी चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.






























































