
>> दिलीप ठाकूर
चित्रपटाच्या जगात अनेक गोष्टींतील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक पाठबळ. अर्थात, चित्रपट निर्मितीतील सर्वात महत्त्वाची बाब आणि चित्रपट निर्मितीला अर्थपुरवठा करणारे अनेक जण या क्षेत्रात वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. ते अन्य एखाद्या व्यवसायात स्थिरस्थावर असतात, आपला तो अथवा ते उद्योग सांभाळून चित्रपट निर्मितीला अर्थपुरवठा करतात. अशोक रंगलानी अगदी असेच होते. एकीकडे अर्थ पुरवठादार म्हणून ओळखले जात असतानाच त्यांनी आपले बंधू विजय रंगलानी यांच्या सोबत काही चित्रपटांची निर्मितीही केली.
त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांतील एक वैशिष्टय़पूर्ण चित्रपट म्हणजे ‘यशवंत’ (1997). नव्वदच्या दशकात नाना पाटेकरने आपल्या चित्रपटात भूमिका साकारावी म्हणून आघाडीचे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक बरेच दिवस प्रयत्न करत असत, पण नाना पाटेकर सहजी ‘हो’ म्हणत नसे आणि पटकथा आवडली, दिग्दर्शकाशी सूर जमले तरच तो होकार देत असे. दिग्दर्शक अनिल मट्टू याची तात्कालिक सामाजिक राजकीय स्थितीवर रोखठोक भाष्य करणारी गोष्ट आवडली म्हणून त्याने ‘यशवंत’ या चित्रपटात भूमिका साकारली. नाना पाटेकरने या चित्रपटाच्या पोस्टर्सबाबतही विशेष रस घेतला, एक निश्चित पह्कस ठरवला म्हणून हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले. या चित्रपटात मधू, मोहन जोशी इत्यादींच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे मकरंद अनासपुरे याचीही या चित्रपटात छोटीशी भूमिका आहे. हा चित्रपट म्हणजे अशोक रंगलानी यांच्यासाठी सुखद अनुभव ठरला. या चित्रपटातील नाना पाटेकर याचा ‘एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’ हा संवाद त्या काळात गाजला आणि आजही लोकप्रिय आहे. अंधेरीतील फिल्मालय स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये या चित्रपटाच्या विशेष खेळासाठी त्यांनी आकर्षक सजावट करतानाच आवाजाची तीव्रता योग्य आहे ना, हे अगोदरच तपासून पाहिले होते.
अशोक रंगलानी यांनी अशोक गायकवाड दिग्दर्शित ‘परवाने’ (या चित्रपटात अविनाश वधावन, सिद्धार्थ रे, वर्षा उसगावकर, शिल्पा शिरोडकर, अजिंक्य देव, परेश रावल, टिनू आनंद इत्यादींच्या प्रमुख भूमिका), सुनील अग्निहोत्री दिग्दर्शित ‘जय किशन’ (या चित्रपटात अक्षय कुमार, आयेशा जुल्का, रिमा लागू, दीपक शिर्पे, चांदनी इत्यादींच्या प्रमुख भूमिका) इत्यादी चित्रपटांची निर्मिती केली. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी पुढे असणं, धावून येणे हे त्यांचे वैशिष्टय़ होते. खरं तर त्यासाठीच ते जास्त ओळखले जात.































































