
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
अमेरिकेचे विमानवाहू युद्धनौका दल (Carrier Strike Group) हे जगातील सर्वात शक्तिशाली मानले जाते, परंतु मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू नौकेच्या नऊ महिन्यांच्या तैनातीमुळे अमेरिकन नौसैनिकांमध्ये निर्माण झालेला मानसिक ताण आणि मनोबलातील घसरण यामुळे अत्याधुनिक शस्त्रे आणि जागतिक सामर्थ्य असूनही दीर्घकालीन युद्ध किंवा सततची तैनाती एखाद्या महासत्तेलाही कमकुवत करू शकते का, हा प्रश्न समोर आला आहे.
सामान्यतः अमेरिकन विमानवाहू नौकांची तैनाती सहा ते सात महिन्यांची असते, परंतु मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे यूएसएस अब्राहम लिंकन आणि तिच्या युद्धगटाला जवळपास नऊ महिने समुद्रात राहावे लागले. अनेक नौसैनिकांनी सलग 250 दिवसांपेक्षा अधिक काळ कोणत्याही महत्त्वाच्या बंदरभेटीशिवाय समुद्रात वेळ घालवला. समुद्रातील जीवन हे अत्यंत कठीण असते. मर्यादित जागा, सततची डय़ुटी, कुटुंबापासून दूर राहणे, युद्धसज्जतेचा ताण आणि बंदिस्त वातावरण यामुळे मानसिक तणाव वाढतो. त्यातच अन्न पुरवठा, स्वच्छ पाणी, निवास व्यवस्था आणि स्वच्छतागृहांशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास परिस्थिती अधिकच गंभीर बनते.
दीर्घकाळ चालणाऱ्या अशा तैनातीमुळे सैनिकांमध्ये थकवा, चिडचिड, निर्णय क्षमता कमी होणे आणि कार्यक्षमतेत घट दिसून येते. आधुनिक युद्धात प्रगत तंत्रज्ञान महत्त्वाचे असले तरी त्याचे संचालन करणारा सैनिकच निर्णायक असतो. सैनिक मानसिकदृष्टय़ा खचला तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देखील अपेक्षित परिणाम देऊ शकत नाहीत.
अमेरिकन नौदलातील काही अहवालांमध्ये नौसैनिकांमधील आत्महत्येचे विचार, नैराश्य आणि जहाजावरून उडी मारण्याचे प्रयत्न यांसारख्या गंभीर घटनांचा उल्लेख आढळतो. अमेरिकन नौदलाने अशा अहवालांचे महत्त्व कमी करून दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी अमेरिकन संसदेतील काही सदस्यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली आहे.
युद्धशास्त्रातील एक मूलभूत तत्त्व सांगते की, ‘मनोबल (Morale) हे युद्धातील अदृश्य शस्त्र आहे.’ दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनने जर्मनीविरुद्ध आणि व्हिएतनाम युद्धात उत्तर व्हिएतनामने अमेरिकेविरुद्ध टिकून राहण्यामागे केवळ लष्करी क्षमता नव्हे, तर सैनिक आणि समाजाचे मनोबल हे महत्त्वाचे कारण होते. यूएसएस अब्राहम लिंकनवरील परिस्थिती दर्शवते की, मानवी सहनशक्तीची मर्यादा ओलांडली गेल्यास युद्ध क्षमता घटते. थकलेल्या सैनिकांकडून चुका होण्याची शक्यता वाढते. विमानोड्डाणे, क्षेपणास्त्र प्रणाली, रडार ऑपरेशन्स किंवा समुद्री नाकेबंदी यांसारख्या जटिल मोहिमांमध्ये अशा चुका गंभीर परिणाम घडवू शकतात.
मध्यपूर्वेत इराण आणि त्याच्या समर्थित गटांविरुद्ध अमेरिकेला सातत्याने समुद्री उपस्थिती राखावी लागत आहे. लाल समुद्रातील हुथी हल्ले, इस्रायल-इराण संघर्ष आणि आखाती प्रदेशातील अस्थिरता यामुळे अमेरिकन नौदलावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. या परिस्थितीत युद्ध सामग्रीचा वापर मोठय़ा प्रमाणात झाला आहे. क्षेपणास्त्रे, दारूगोळा आणि इतर सामग्रीची पुनर्भरण प्रक्रिया अपेक्षेपेक्षा अधिक वेळखाऊ आणि खर्चिक ठरत आहे. पुरवठा साखळीवरील ताणामुळे नौदलाच्या दीर्घकालीन मोहिमांवर परिणाम होऊ शकतो.
जर अमेरिकेचे विमानवाहू नौकादल मध्यपूर्वेत अडकून राहिले, तर चीनला या प्रदेशात तुलनेने अधिक स्वातंत्र्य मिळू शकते. चीनने गेल्या दशकात दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेटे उभारून त्यांचे लष्करी तळांमध्ये रूपांतर केले आहे. धावपट्टय़ा, क्षेपणास्त्र प्रणाली, रडार नेटवर्प आणि नौदल सुविधा उभारून चीनने या भागात आपली उपस्थिती मोठय़ा प्रमाणात वाढवली आहे. अमेरिकन उपस्थिती कमी झाल्याचा फायदा घेत चीन आपल्या दाव्यांना अधिक आक्रमकपणे पुढे रेटू शकतो. व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि मलेशिया यांसारख्या देशांवर दबाव वाढू शकतो. चीनची सागरी मिलिशिया आणि कोस्ट गार्ड जहाजे आधीच या भागात मोठय़ा प्रमाणावर सक्रिय आहेत.
दक्षिण चीन समुद्रातून दरवर्षी ट्रिलियन्स डॉलर्स किमतीचा जागतिक व्यापार होतो. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि पूर्व आशियाशी व्यापारासाठीही हा सागरी मार्ग महत्त्वाचा आहे. जर चीनने या भागावर प्रभावी नियंत्रण प्रस्थापित केले तर त्याचा परिणाम केवळ अमेरिकेवरच नव्हे तर भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि ASEAN देशांवरही होईल. मुक्त नौकानयनाचा (Freedom of Navigation) सिद्धांत कमकुवत झाला तर जागतिक व्यापार साखळीवर परिणाम होऊ शकतो.
यूएसएस अब्राहम लिंकनवरील संकट हे आधुनिक युद्धातील एक महत्त्वाचे वास्तव उघड करते- मानवी सहनशक्ती, मनोबल आणि लॉजिस्टिक्स या घटकांकडे दुर्लक्ष केल्यास महासत्तादेखील अडचणीत येऊ शकते. अत्याधुनिक विमानवाहू नौका, क्षेपणास्त्रे आणि तंत्रज्ञान असूनही थकलेले सैनिक आणि तणावग्रस्त दल दीर्घकाळ प्रभावीपणे कार्य करू शकत नाहीत. अमेरिकेच्या या अनुभवातून भारताने धडा घ्यायला हवा. भविष्यातील संघर्ष दीर्घकालीन, बहुआयामी आणि संसाधन-केंद्रित असतील. त्यामुळे मजबूत लॉजिस्टिक्स, पुरेशा युद्धसाठय़ांची उपलब्धता, सैनिकांचे रोटेशन, मानसिक आरोग्य व्यवस्थापन आणि विश्वसनीय भागीदारी हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे प्रमुख स्तंभ असतील. युद्धातील विजय केवळ रणांगणावर नव्हे, तर सैनिकांच्या मनात, पुरवठा साखळीत आणि राष्ट्राच्या दीर्घकालीन सहनशक्तीत घडतो आणि हाच यूएसएस अब्राहम लिंकनच्या अनुभवातून भारताने शिकण्यासारखा मोठा धडा आहे.
भारतासाठी धडे
- रशिया-युव्रेन युद्ध, गाझा संघर्ष आणि यूएसएस अब्राहम लिंकनचा अनुभव एकच गोष्ट स्पष्ट करतात- युद्ध केवळ रणांगणावर जिंकले जात नाही; ते पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्सवर जिंकले जाते.
- भारताने दारूगोळा, क्षेपणास्त्रे, इंधन आणि सुटे भाग यांचा दीर्घकालीन साठा निर्माण करणे आवश्यक आहे. स्वदेशी संरक्षण उत्पादन वाढवून युद्धकाळातील बाह्य अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे.
- लडाख, सियाचीन, जम्मू-कश्मीर आणि ईशान्य भारतातील तैनाती दीर्घकालीन स्वरूपाच्या असतात. त्यामुळे सैनिकांचे नियमित रोटेशन, विश्रांती आणि पुनर्वसन यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
- मानवी संसाधन व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास सैनिकांचा थकवा युद्ध क्षमता कमी करू शकतो. आधुनिक युद्धात सैनिकाचे मानसिक आरोग्य हे शस्त्रास्त्रांइतकेच महत्त्वाचे बनले आहे.
- भारतीय सशस्त्र दलांनी मानसिक आरोग्य कार्यक्रम, समुपदेशन, कुटुंबीयांशी संपर्प व्यवस्था आणि ताण व्यवस्थापन यावर अधिक भर देणे आवश्यक आहे.
- भविष्यातील युद्ध अधिक प्रदीर्घ आणि बहुआयामी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैनिकांचे मनोबल टिकवून ठेवणे ही राष्ट्रीय सुरक्षेची गरज आहे.































































