पोलीसच बनला दरोडेखोर; चार साथीदारांच्या मदतीने अंगडिया व्हॅन लुटली, ६१ लाख ५० हजारांची रोकड घेऊन पसार | 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खर्डीजवळ पोलिसानेच आपल्या चार साथीदारांच्या मदतीने अंगडिया व्हॅनवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या टोळक्याने फिल्मी स्टाईलने व्हॅनसमोर गाडी आडवी घातली. त्यानंतर आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करून व्हॅनचालक आणि वाहकाला बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर त्यांच्याकडून ६१ लाख ५० हजारांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून ‘दरोडेखोर’ पोलिसासह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सुरतमध्ये राहणारे गोविंद पटेल हे ग्वाल्हेर येथील के.पी.अंगडिया कंपनीत व्हॅनचालक म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे ते जिगर पटेल यांच्यासोबत ग्वाल्हेर येथून मुंबईच्या दिशेने १ कोटींची रोख रक्कम घेऊन निघाले. खर्डी येथील तुलीप हॉटेलमध्ये त्यांनी रात्रीचे जेवण केले आणि पुढील प्रवासासाठी निघाले. त्याच वेळी एक कार त्यांच्या व्हॅनसमोर आडवी आली. त्यातून तीन जण खाली उतरले. त्यांनी व्हॅनची काच ठोकून उघडण्यास सांगितले. काच उघडताच आम्ही क्राईम ब्राँचचे पोलीस आहोत. तुमची गाडी पोलीस चौकीत घेऊन चला असे सांगितले आणि व्हॅनची चावी घेतली. गोविंद आणि जिगर या दोघांना मधल्या सीटवर बसवून बेदम मारहाण केली.

लुटलेली रक्कम अधिकृत

लुटलेली ही रक्कम बेकायदेशीर असल्याने दरोडेखोरांनी हा डाव साधल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र व्हॅनचालकाकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही रोकड अधिकृत असल्याचे पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांनी सांगितले. याचा अधिक तपास उपअधीक्षक नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सात दिवसांची कोठडी

मुंबई-नाशिक महामार्गावरील एका बंद हॉटेलजवळ व्हॅन थांबवून पुन्हा बेदम मारहाण करत वाहनातील ६१ लाख ५० हजार रुपये घेऊन कारमधून पाचही जण पळून गेले. घाबरलेल्या चालकाने शहापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे पाच जणांना अटक केली. या दरोड्यात एक पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून त्याच्यावर याआधीही अनेकवेळा कारवाई करण्यात आल्या आहेत. अटक आरोपींना शहापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.