दरवाजात उभे राहण्यावरून वाद, तरुणाला लाथ मारून धावत्या लोकलबाहेर फेकले; बोरिवली-विरारदरम्यानची घटना, 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकलच्या दरवाजात उभे राहण्याच्या वादातून एका तरुणाला धावत्या ट्रेनबाहेर फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पश्चिम रेल्वेच्या गोरेगावहून विरारकडे जाणाऱ्या धिम्या लोकलमध्ये बोरिवली स्थानकादरम्यान ही घटना घडली. तौसिफ शेख (२४) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो विरार येथील रहिवासी आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी राहुलकुमार पांडे (३०) या हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे.

तौसिफ शेख हा विरार पश्चिम येथे राहतो. तो मुंबईत सुतार काम करतो. काम संपवून तो २५ ऑगस्ट रोजी रात्री ८.४१ च्या सुमारास गोरेगावहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने रात्री उशिरा घरी निघाला होता. लोकल बोरिवली स्थानकात पोहोचल्यानंतर तौसिफने दरवाजात उभा असलेल्या राहुलकुमार या प्रवाशाला आत सरकरण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. बोरिवली स्थानकातून लोकल सुटल्यानंतर वादाचे रूपांतर झटापटीत झाले. यावेळी संतापलेल्या राहुलकुमारने तौसिफच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. लाथ बसताच तौसिफ ट्रेनच्या बाहेर फेकला गेला आणि रुळावर कोसळला. या घटनेत त्याच्या डोक्याला तसेच हात आणि पायांना गंभीर दुखापत झाली.

आरोपी राहुलकुमार पांडेला अटक

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी तौसिफला प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटना घडल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या राहुलकुमार पांडे याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फटका मारून एक्स्प्रेसमधून मोबाईल लंपास

आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ ‘फटका गँग’ने राज्यराणी एक्सप्रेसच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका प्रवाशाचा मोबईल लंपास केला. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सिन्नर तालुक्यातील परमानंद आव्हाड (२१) हा तरुण कल्याण स्थानकात उतरण्यासाठी टिटवाळा स्थानक ओलांडल्यानंतर ट्रेनच्या दरवाजाजवळ येऊन उभा राहिला. ट्रेन आंबिवली स्थानकाजवळ पोहोचताच तिचा वेग मंदावला. त्याच वेळी रेल्वे उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या तीन मुलांपैकी एकाने परमानंदच्या हातावर काठीने जोरात प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोबाईल हातातून निसटून रेल्वे रुळांलगत पडला. जो खाली उभ्या असलेल्या चोरांनी तातडीने उचलला आणि पळ काढला.